marathi blog vishva

शुक्रवार, ८ एप्रिल, २०११

नारदाची कळ---१३
अण्णांचे फिक्सिंग
२-जी, कॉमनवेल्थ, आदर्श, नोट-फॉर-व्होट, देवास, सीव्हीसी व अशा अनेक घोटाळ्यांमुळे कॉंग्रेसची छबी मळली, हे तर त्यांनाही कळलेच. तशात तीन-चार राज्यात निवडणुका लढवायच्या आहेत. तिथेही ह्या भ्रष्टाचारामुळे मार खावा लागेल. आता भ्रष्टाचाराची ही छबी धुवायची तर आपण भ्रष्टाचार विरोधी आहोत, हे लोकांना सहजी पटेल असे व्हायला पाहिजे. भ्रष्टाचार न करता राज्य करणे, हे तसे जिकिरीचे व लांब पल्ल्याचे काम. त्याच्याने छबी धुवायला खूपच उशीर लागेल. गेले तीन चार महिने आपले संवाददाते तुमच्यापेक्षा आम्ही बरे आहोत, निदान कारवाई करतो आहोत, असे घसा फोडून फोडून तसा प्रयत्न करताहेत . पण ते कसे तुलना केल्यासारखे होते. आधी त्यांचे नाव घ्यावे लागते. आम्हीच बेश्ट आहोत असे ठसवायला हवे. तर मग स्वच्छ वागून दाखवायला हवे. पण, तितका वेळ आहे कुणाकडे ? मग मालिकेत कसे, नायिकेचे चारित्र्य उठविण्यासाठी खलनायकाला अडचणीत आणतात, त्याला हाणतात, तसे, शत्रूचा शत्रू तो मित्र, ह्या वळणाचे काही तरी पटकन करायला हवे. हे कसे करायचे ? ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्यावर कठोर कारवाई करायची वगैरे बाळबोध मार्गाने एकतर वेळ चिक्कार लागेल व शिवाय त्यात आपला काय फायदा ? आणि तरीही छबी अशी झाली पाहिजे की बघा, आम्ही किती भ्रष्ट्राचार्‍यांच्या विरुद्ध आहोत हे पटकन जनतेच्या ध्यानात यायला हवे.
तर साहेब, तुम्ही ते हिंदू आतंकवाद्यांचे चित्र उभे केले होतेत, तसे काही कराना. तुमच्याकडे एवढ्या आयडिया असतात. मग जमले तर तुमच्या लव्हासाचे बघू ना काही निस्तरता येते का ते. तर काही तरी छबी सुधरवण्याचे बघाच . भ्रष्टाचाराच्या विरोधी आहोत असे चित्र तयार होईल असे काही तरी बघा ना.
हां. भ्रष्टाचार का ? भ्रष्टाचार-विरोधी छबी काय ? बरं, अरे ते आपले अण्णा काय करताहेत आजकाल ? काही नाही ? लोकपाल बिलाचा आराखडा वगैरे करताहेत. व्वा ! व्वा ! बेस ! काम झाले की. त्यांना बोलवा इथे. बसवा जंतर मंतर ला. फार तर काय, तर बिलाचे करावे लागेल एवढेच ना ? अशी तर, ढीगभर बिले पडून आहेत आपल्याकडे. त्यातून नंतर काही तरी मार्ग काढता येईल. शिवाय नंतर कमीटीतही काहीतरी करता येईलच. पण आत्ता तर परस्पर रान पेटवून आपली पोळी शेकता येईल. फक्त माझे नाव मध्ये आले नाही पाहिजे. ते अवघड नाही हो, तुम्ही चिडून कमीटीतून बाहेर पडा, म्हणजे कोणाला संशयही येणार नाही. पण थोडे ताणून धरले पाहिजे. जॉइंट कमीटीसाठी . असे कसे करता येईल म्हणायचे . मग पार्लमेंटच बरखास्त करा म्हणायचे . मग कमीटीत पाच जण घेतो म्हणायचे, मग नोटिफिकेशन नाही काढत म्हणायचे . आत्ता मॅडम दक्षिणेत निवडणूक-प्रचारात आहेत म्हणायचे . आणि मग मी सांगीन तेव्हा हो म्हणायचे. मग अण्णांची तारीफ करायची. त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईचे खूप स्तोम माजवायचे . पाहिजे तर भारत-रत्नही द्यायचे. मग आपसुकच आपण त्यांचे मानले, म्हणजे आपण त्यांच्या बरोबरच होतो, हे वेगळे सांगायला नकोच. निवडणुकात बघा ह्यावरच मतं मिळतात की नाही.
पण, हे बघा, हे सगळे आमच्या आय-पी-एल च्या आधी संपले पाहिजे हां. नाही तर आमचा धंदा मंदा व्हायचा !
ओ के ? फिक्स ?

----------------------------------------------------------------------------------

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

जातीच्या लेखकाला, जातीचा पद्मश्री !
नेमाडेंना पद्मश्री मिळाल्याबद्दल काय वाटते ? असे जे विचारतात, त्यांना सांगावेसे वाटते की, प्रथम त्यांनाच काय वाटतेय ते बघूया. आता त्या थोर थोर मिशीतले, ह्या मिशाने ऐकायला मिळणार, असे वाटून गर्भगळित व्हायचे कारण नाही. कारण प्रत्येक दृष्ट्या पुरुषांसारखे त्यांनी, हे देशीवादी परंपरेने मागेच सांगून ठेवले आहे. कसे ते पहा: (टीकास्वयंवर पृ.३८३) "एकतर राष्ट्रीय पारितोषिकं ही कंपूशाहीतून निर्माण होणार्‍या दोनचार मूर्ख माणसांच्या मर्जीवर ठरत असतात."
कंपूशाही, दोनचार मूर्ख माणसं, असे कळीचे शब्द ऐकून भालचंद्र मुणगेकरांना वाटले असेल ह्याला "मागचे" कळले की काय ? तरी बरे की सिमल्याच्या शिष्यवृत्तीचे मीच जमवून आणले होते, ते हा विसरला की काय ? मग राडीया टेप्स कोणी लीक केल्या ह्या चालीवर ते प्लंबरसारखे लीक हुडकू लागले. तोच त्यांना राष्ट्रपतीभवनातून फोन आला की, "अहो आमच्या त्या ह्यांचे काही करा बरं !"
आता महाराष्ट्राचा कोटा, यादी, केव्हाच संपली असताना, आता बाई कोणाचे सांगताहेत बरे ? एकच काम अनेक जणांनी वाटून घेण्याच्या तीळ-संस्कारा प्रमाणे, बाईंनी विलासरावांनाही निरोप दिला. विलासरावांना कळेना की एवढा काय प्रॉब्लेम त्यात ? आपण घालू तो आदर्श ! मग कळले की महाराष्ट्राच्या कोट्यात, साहित्याच्या जंत्रीत, बाईंच्या पसंतीचे नाव काही नव्हते. ते राहिलेच.
विलासराव गेले शिंद्यांकडे. शिंद्यांनी धूर्तपणे विचारले की बाई एक्झॅक्टली काय म्हणाल्या ? आता "अहो आमच्या त्या ह्यांचे काही करा बरं!" ह्यातून अर्थ काढायचा होता. शिंदे तसे कशातूनही "अर्थ" काढण्यात पटाईत. ते म्हणाले बाई म्हणाल्या "आमच्या त्या ह्यांचे", म्हणजे कोणी लेवा-पाटील असणार. कोण बरं ? लेवा पाटील म्हणतात की मूळचे पाकीस्तानातल्या पंजाब मधले, लाहोरचे. आता त्या अफझल गुरूचा कोणी आहे की काय ? काही नेम नाही ! जरा मोघम चौकशी करू. आधी दरवानाला विचारतात, कौन मुसलमान हौ क्या ? दरवान हिंट देतो, नही जी, हिंदू ही है !
तेव्हढ्यात मुणगेकर म्हणतात अहो "हिंदू"म्हणजे नेमाडे असतील. कारण तेच एकमेव लेवा आहेत मराठीत, बहिणाबाई नंतर !
विलासराव म्हणतात की उगाच रिस्क घेऊ नका. मॅडमनी सांगून ठेवलेले आहे की बाईजींवर उगाच प्रेशर येऊ देऊ नका. त्या आपल्या अफझल गुरूचे पाहताहेत ना, मग त्यांच्या एका हिंदू चे आपण पाहू शकत नाही का? चला जरा प्रयत्न करू ! मुणगेकर, काय आहे हो हे हिंदू ? त्यावर मुणगेकर म्हणतात की तसे साहित्य अकादेमीला सांगितलेले होते... पण अजून त्यांनी काही पुरस्कार दिलेले नाहीत. तेव्हा बाईंना आत्ताच काही करायचे असेल... तसे हे लेवा पाटील मूळचे पंजाब, पाकीस्तानातल्या लाहोरचे. मग विलासराव माहीती काढतात की पंजाबची लिस्ट झाली का फाइनल.? झाली ! हरयाणाची ? ती अजून बाकी आहे. असं म्हणता ? मग काही प्रॉब्लेम नाही. नुकतेच विश्वास पाटिलांनी नाही का सांगितले की पानीपतानंतर भाऊ वगैरे मंडळी हरयाणातच होती व तिथे त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते लोक चालीरीती, फेटा वगैरे मराठी वळणाचाच बांधतात. आपण त्यांच्याच फेट्याला हे लचांड बांधू .
अफजल गुरूच्या बदल्यात जमले म्हणायचे की !
तुम्हाला वाटेल का उगाच जात काढताहेत अशा वेळी ? तर तेही नेमाडेंनीच शिकविले म्हणावे लागेल. जात काढण्यात काय संकोच ? म्हणूनच तर त्यांनी "हिंदू" त ज्ञानेश्वरांची व रामदासांची जात आरामात काढली आहे. कुणब्यांचीही काढली आहे. एवढेच काय सिद्धार्थ गौतमालाही दूषणे दिली आहेत. शिवाय अशा जाती काढून त्यांनी वेळोवेळी आदर्श घालून दिले आहेत. जसे:( टीकास्वयंवर पृ.३७९ ):"आमच्या वेळी साधना होती...आज साधना ही ट्रस्ट समाजवादी चित्पावनांनी बुडवली. केसरीच्या सिंहाला गवत खायला लागलं. सेवादलातली समाजवादी माणसं कटटर जातीयवादी निघाली." ( इत:उप्पर ते अभिमानाने म्हणतात की त्यांना फक्त ( नशीब, फकत, नाही ! ) साने गुरुजी भावतात व त्यांनी साधनेत एक वर्ष नोकरीही केली आहे. ).
खरे तर २००१ साली महाराष्ट्र फौंडेशनने नेमाडेंना जीवन-गौरव पुरस्कार दिलेला होता. म्हणजे ते तेव्हाच बक्षीस मिळालेले लेखक झालेले होते. त्यांनी इतर लेखकांना आदेश दिला आहे तो असा: "अशा बक्षीस न मिळालेल्या थोर लेखकांच्या यादीत बसण्याचा प्रयत्न करावा, असं मी चांगल्या लेखकांना सांगेन. कारण बक्षीस मिळालेल्या लोकांच्या यादीत बसण्यापेक्षा ते न मिळालेल्या लेखकांच्या यादीत जाऊन बसणं अर्थातच सोपं असतं." ( टीकास्वय़ंवर पृ. ३८४ ). ३५ वर्षात हिंदू ने त्यांना इतकं पिडलेलं दिसतं की त्यांनी स्वत: कुठल्या यादीत बसायचं हेच ते विसरले असावेत ! किंवा मग विद्रोह भावला असावा ! आदत से मजबूर !
तर असा जातीच्या लेखकाचा जातीचा किताब !

-----------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

शनिवार, १५ जानेवारी, २०११

नारदाची कळ---१२
अकलेच्या कांद्याची गोष्ट
एक होता कांदा. अहो तो महाग-वाला नाही, अकलेचा. अकलेला मती म्हणतात, तर हा बारा अकलेचा ! ( कदाचित बारामतीचा !) तो अगदी पहिल्यांदा बेता बेताने, बांधा बांधाने ( कुंपणा कुंपणा ने ) लागवडलेला होता. त्याच्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. तोच कुंपणाच्या देवाने, कराडच्या देवाने, त्याला आपल्यात घेतले, आपला मानसपुत्रच मानले व स्वत:सारखे "यशवंत" केले. ह्यानेही सहकार दिला, घेतला. होता होता, हा सगळीकडेच वावरू लागला. राज्यात मुख्य झाला, केंद्रात सुरक्षेच्या बाडबस्तात सुरक्षित झाला. कांद्याला असे घुमारे फुटू लागल्यावर त्याला आपल्या मुळाचा लईच अभिमान वाटू लागला. कोणाचे मूळ परदेशी असेल तर ते त्याला रुचेना. त्यासाठी त्याने आपापल्या मुळांचा देशी वाफाच काढला, ताफा वाढवला व विदेशी मुळांना तो कमी लेखू लागला.
पण भारतदेवाच्या मनात काही वेगळेच होते. परदेशी मुळाचे कांदे जोम धरू लागले, त्यांना कुठली तरी सूप्त परदेशी गंगाजळी मिळू लागली व त्या परदेशी कांद्याने चांगलेच बाळसे धरले . सगळे वावर व्यापून टाकले. आता बांध्यावरच्या कांद्याला मुख्यप्रवाहात डुंबावे असे हुळहुळू लागले. मग त्याने मुळेच ना ती, ती देशी काय व परदेशी काय असे म्हणत परदेशी मुळांच्या कांद्याशी दिलजमाई केली. परदेशी कांद्याला खांदा दिला, सापडेल तिथे चांद्या शोधल्या, जमवल्या, आणि देशात सगळीकडे आपल्या फांद्या पसरविल्या.
परदेशी कांद्याची रीतच न्यारी. त्याला वाटू लागले मी किती निर्मळ, स्वच्छ संगमरवरी ( इटालियन संगमरवरच जणु ) रूप, काय ती उभारी, काय तो तोरा ! तेव्हढ्यात त्या परदेशी कांद्याला आतले आवाज ऐकू येऊ लागले. त्यालाही वाटू लागले आपण जरा आतल्या आतच रहावे. कावळा शिवल्यासारखे बाजूलाच रहावे . आपण पुढे होऊ नये. मग त्याने त्यातल्या त्यात धुतलेल्या तांदळासारखा वाटणार्‍या पंजाबी कांद्याला पगडी पहनवली. पगडी, आनंदाने परदेशी कुंकू मिरवू लागली. बारा-अकलेच्या कांद्याने वाफ्यात नफा काढायची जबाबदारी घेतली. सगळीकडचे वाफे तरारून येतील, असे तो सांगू लागला. आपले मूळ गाव, बारा-अकली गाव, असलेल्या राज्यात देशी-विदेशी कांद्याची जोड-लागवडही त्याने चालू ठेवली.
बारा-अकली कांदा जोशात आला, उडू बागडू लागला, खेळ खेळू लागला. असा तसा देशी खेळ नाही तर परदेशी कांद्याला टुकटुक करणारा, त्याची विकेट काढणारा, परदेशी खेळ, क्रिकेट ! हा खेळ इतका चढू लागला की त्या बोभाट्या पाई त्याला लोक पीयेल समजू लागले. तो म्हणे काय बोलता, मी ? आय पीयेल ?
वाफ्यावरचे काम असे चालू असताना एक अवघड घडी आली. वाफ्याचा खर्च ताफ्याला परवडेना . ताफ्यातले एकेक गडी आत्महत्येने पडू लागले. सगळीकडे गदारोळ माजला. बारा-अकली कांद्याने थाप ठोकली, ही कांद्याची शेतीच परवडणारी नाही . सबब कोणी कांदे पेरुच नयेत. पगडी गदगदली. तिला वाटले जीव वाचला तर पगडी काय, पचास पेहनू . मग त्याने ताफ्याला सर्व-माफी दिली, कर्ज-माफी दिली. बारा-अकली कांद्याला हुरूप आला. त्याने आता थंड हवेच्या ठिकाणी लागवड होऊ शकते का, हे पाहण्यासाठी डोंगर कापले, दर्‍या बुझवल्या व उंचावर एक ठिकाण केले, इतके छान की बारा-अकली कांदा अगदी "हवासा" झाला, लव्हासा झाला !
तेव्हढ्यात कोणाची तरी नजर लागली. आतल्या गाठीच्या ह्या बारा-अकली कांद्याच्या तोंडाशी एक गाठशी आली. फवारून झाले, टोकरून, खुडून झाले. तशी तरारी आहे, खतपाणी अंगी लागते आहे. पण त्या तोंडाच्या गाठी मुळे तोंडातून शब्दांऐवजी आजकाल मुक्ताफळेच येतात. लवकरच आलबेल होईल असे म्हणायचे असते, पण तोंड बोलून जाते...कमसे कम तीन हप्ते लगेंगे ! परदेशी कांद्याचा छोटा कोंभ, हूल देत, मग रागावून म्हणतो, मेरे दादी का राज अकेली का था, ये हमारी मजबूरी है, ( मजबूरी का नाम गांधी !). त्यावर तोंड लगेच तावातावात उदगारते, इटली मे भी मजबूरीच है ! पगडी घाबरून पाकी कांद्याला पाचारण करते तर तोंड लगेच खोड काढते, ह्यापेक्षा आपल्याच बळीराजांना का नाही देत जरा ज्यास्तीचा भाव ?
पानीपतावर मराठयांची पत गेल्याला भले आज अडीचशे वर्षे झाली असतील, पण त्याचा वचपा काढतोय, बघा, बारा-अकली कांदा व त्याचे तोंड !

सोमवार, २७ डिसेंबर, २०१०

नारदाची कळ----११
जगतगुरू कोंड देव !
जरा विचार करून पहाल तर इतिहास-तज्ज्ञाशिवाय तुम्हाला पटेल की दादोजी कोंड देव हे शिवाजीचेच काय सगळ्या जगाचेच गुरू आहेत. जगतगुरू !
संभाजी ब्रिगेड पासूनच बघा. ह्यांच्या निडर कार्यकर्त्यांनी मागे जे भांडारकर संस्थेत घुसून शौर्य दाखविले त्याचे खरे श्रेय व प्रेरणा कोणाची ? तर आब दवडणार्‍या आबांची ! राष्ट्रवादीची. कशी ? इतर कोणत्याही सरकारने ह्यांना कोंडले असते तुरुंगात. पण ह्यांचेच कोंड देव ( इतने बडे शहर मे ऐसे हादसे अक्सर होते रहते है--फेम ! ) ह्यांच्याकडे कानाडोळा करते झाले. म्हणजे गुरू झाले कोंडदेव, व तेही दादागिरी करणारे दादोजी !
यशवंतराव चव्हाणांच्या स्मृती निमित्त पवार साहेबांनी एक फार मौलिक निरिक्षण नोंदवले की एवढे आयुष्य काढून यशवंतरावांची वैयक्तिक मालमत्ता किती ? तर अवघी, एक दोन लाखाची. जे पवार साहेब म्हणाले नाहीत ते "आणि माझी ?" ते आपण म्हटले तर ? ह्यांच्याही सर्व प्रगतीचे श्रेय कोणाला ? तर कोंड देवांना ! म्हणजे कोण ? तर कुटुंबाची माया, प्रकृती, ह्यांना कोंडते ! शेती परवडत नाही, कर्ज माफी देऊ नये, कांदा अजून महागणार, परदेशात शेती करा असे असंख्य उदगार जे तोंड काढते त्यालाच कोंडणारा हा कोंडदेव रोग ! दर महिन्या दोन महिन्यातून त्याला डागण्या मिळतात !
कुटुंबाची माया ही फार मोठी कोंडणारी देवता आहे. अशोक चव्हाणांना विचारा ! बाकीचे सर्व पचले आणि नेमके नातेवाईकांच्याच आदर्श घरांनी घरघर लावली. इतके करूनही वखवख थांबत नाही. ही थांबवायला एकच देव समर्थ आहे व तो म्हणजे कोंड देव ! त्याला शिवाजी पासून कापून काढला तर आता तो कोणाला का सोडील ?
सर्व विश्व हे एक खेळाचे मैदान आहे व सर्व पैसा-अडका हा एक पोरखेळ आहे असे वाटणार्‍या वैमानिकाचे मनसुबे हवेत झेप घेत असतात. त्याला एकमेव भेव आहे ते कोंडण्याचे, कोंड देवाचे ! तरच तो जमीनीवर येणार !
क्षणात ब्रिगेड बनणारी जात लगेच मागासलेली बनून आरक्षण मागू पाहते, सत्ता काबीज करण्यासाठी इटालियन व्यक्ती पंतप्रधानपदी नको म्हणत म्हणत शेवटी त्यांच्यासमोरच कण्हत कण्हत उभी राहते आणि ह्या सगळ्या नाट्याला भूलून जर जनता ह्यांनाच निवडून देत असेल तर जनतेलाही असेच कोंड देव लखलाभ होतील ! जय जगतगुरू कोंड देव !

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०१०

नारदाची कळ-----९
सोपी लिकिते !
विकी-लीक्स ने इतके भंडाऊन टाकले आहे की आता "गुपिते"ला पर्यायी शब्दच झाला आहे : "लिकिते" !. मराठीत र्‍हस्व दीर्घाची भानगड ह्या शब्दाला लागू होत नाही. म्हणजे कोणी र्‍हस्व लि व कि वापरले व लिहिले "लिकिते" तर इंग्रजीतले टू लिक म्हणजे चाटणे हा अर्थ धरून हे कोणाचे चाटण आहे ते लोकांनी पहावे. व जर ली व की दीर्घ काढली तर नैतिकता कोणाची लीक होते आहे ते पहावे. आता इतके लीक्स होऊन होऊन सगळा माहोल इतका दल-दलीत झाला आहे की सरळ साध्या गोष्टी आता "सोपी लिकिते" ह्या नावाने प्रसिद्ध होत आहेत. त्यापैकी काही वानगी दाखल पहा:
१) राहूल गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे हिंदू दहशतवाद हा भारताला ज्यास्त धोकादायक आहे का, ह्याची पाहणी सीबीआय ने केली. त्यात त्यांना आढळले: हिंदू दहशतवादी हे फारच बेभरवशाचे आहेत. ते उग्र आंदोलने करतील असे वाटते पण तेव्हा ते करीत नाहीत. राम मंदीर बनवायचे म्हणतात पण बनवत नाहीत. कित्येक ठिकाणी ह्यांचे बॉम्ब फुसके निघतात, फुटतच नाहीत. हे निरनिराळे प्लॅन्सही योजून रद्द करतात. आरएसएस च्या प्रमुखांना मारणार म्हणतात पण कोणीच मारीत नाहीत. आजकाल तर ह्यांच्या संघटना कमालीच्या विचित्र झाल्या आहेत. उदा: गुजरातेत ह्यांच्या पार्टीत मुसलमान निवडून येतात तर हे पार्टीचा प्रवक्ताच मुसलमान ठेवतात. मालेगावच्या प्रकरणातही आढळते आहे की ह्यांनी स्फोटके मुसलमानांकरवी ठेवली. असे जर वाढू लागले तर पुढे चालून भगवा व हिरवा दहशतवाद ओळखू न आल्याने सीबीआयला रंगांधळे व्हावे लागेल.
२) वरील बाबीचा धसका घेऊन सरकारने हिंदूंच्या परिस्थितीची पाहणी करण्याकरिता एक कमिशन नेमले आहे. निवृत्त न्यायाधीश मोहमद रचसा ( हे गृहस्थ "साचर" च्या अगदी विरुद्ध आहेत हा निव्वळ योगायोग समजावा !) सध्या पाहणी करीत आहेत. त्यांचे काही निष्कर्ष : हिंदूंना कधीही आरक्षण नव्हते. त्यामुळे त्यांना सर्वत्र स्पर्धेला तोंड देऊन जगत राहावे लागले. त्यात ते सारखे यशस्वीच होत राहिले. त्याची मुसलमानांना खूप असूया वाटते. तर हा असमतोल घालवण्यासाठी शासकीय नोकर्‍यात हिंदूंना मुसलमानांसारखेच १५ टक्के आरक्षण द्यावे. म्हणजे ते थोडे तरी सुखावतील व आळशी होतील. तसेच सीबीआय च्या पाहणीनुसार सध्या गुन्हेगारात ४० टक्के मुसलमान आढळतात व हिंदू केवळ १० टक्के. तर हाही असमतोल घालवण्यासाठी हिंदूंना गुन्ह्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे. विशेषत: मोठ्या गुन्हयासाठी. जसे पार्लमेंटवर, मुंबईवर हल्ला करणे. फार तर ह्यात आझमगढी मुसलमान बंधू त्यांचे प्रशिक्षण करू शकतील. त्यांना फाशी-माफी देण्याचा सरकारही विचार करील.
arunbhalerao67@gmail.com

गुरुवार, २ डिसेंबर, २०१०

नारदाची कळ---१०

ई-टाली एका हातानेच वाजते !
टाळी म्हणतात एका हाताने वाजत नाही. पण आजकालची ई-टाळी किंवा इटलीच्या लोकांची टाळी एका हातानेच वाजते की काय असे सध्याची प्रकरणे बघता वाटू लागते !
भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी जो अधिकारी नेमावा लागतो, चीफ व्हिजिलन्स कमीश्नर , त्याच्या नेमणुकीचेच घ्या. आता मनमोहनसिंगासारख्या अनुभवी गृहस्थाला तेव्हाच कळले असणार की ज्याच्यावर पूर्वीचे काही खटले अजून चालू आहेत व ज्याच्याबद्दल विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज ह्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यालाच नेमण्याची एवढी काय आवश्यकता आहे. पण टाळी फक्त ई-टाली च देऊ शकतात ह्या नियमाप्रमाणे सोनिया म्हणतील त्यालाच नेमावे लागते. म्हणजे मनमोहन सिंगांनी दाखवून दिले आहे की टाळी साठी इटालीच आवश्यक आहे !
बरे सोनियांना तरी हा थॉमसच का हवा आहे ? तो ख्रिश्चन म्हणून तर नक्कीच नाही. तर तो ऐकण्यातला असणारा राहणार आहे अशी दाट शक्यता आहे. कारण नाही ऐकले तर त्याच्याविरुद्धच्या केसेस आपल्याकडे आहेतच की ! आता ई-टालीचे ऐकणारा असाच माणूस हवा तर त्याला ई-टाली पडणार !
ऐकण्याची मात्तब्बरी का़, तर तसेच भानगडीचे आपले व्यवहार ना ! आता सुब्रण्यम स्वामीच म्हणताहेत की ६० टक्के पैसा आपल्या बहिणींना पोचला आहे तर न जाणो कोणाच्या हाती हे गुप्त नंबर लागले तर नसती आ़फत ! सर्व कारभार सुरळीत झालेला नाही हे तर मनमोहनसिंगानाही ठाऊक आहे. कारण म्हणूनच ते राजाला पत्राद्वारे तुम्ही असे करायला हवे होते असे सांगत आहेत. बरे आत्तापर्यंत आपण सर्व कारभार कसा एका हाती ठेवलेला आहे ! निवडणुकीच्या सभा सुद्धा आपण आपल्याशिवाय इतरांना घेऊ देत नाही. ते माणिकराव वेडयासारखे अनावधानाने म्हणाले असतील पण सर्व वसूली आपल्या एका हातीच आपण ठेवली ना ? तर मग टाली सुद्धा एका ई-टालीनेच वाजली पाहिजे !
जेव्हा आपल्याला आजूबाजूला गोष्टी दिसायला लागतात तेव्हा मग ती गोष्ट अगदी सिद्ध झालेली आहे असे आपण म्हणायला हरकत नाही. जसे समजा आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्यात बहुतेकांची मुले अमेरिकेत असतील तर खूप भारतीय अमेरिकेत गेलेले आहेत ह्या बातमीसाठी वेगळे तपशील जरूरीचे नसतात. तसेच आमचा एक शेजारी नुकताच युरोप दौर्‍यावरून आला तेव्हा सांगत होता की काय हो हे ई-टालीयन लोक, तिथे आमचा गाईड म्हणत होता की आम्ही जगच जिंकणार आहोत, तुमचा देश तर आमचीच बहू हाकीत आहे ! आता वेगळे प्रमाण नकोच. द्यायची तर ती द्या ई-टाळी, एका हातानेच !
arunbhalerao67@gmail.com
नारदाची कळ---१०
ई-टाली एका हातानेच वाजते !
टाळी म्हणतात एका हाताने वाजत नाही. पण आजकालची ई-टाळी किंवा इटलीच्या लोकांची टाळी एका हातानेच वाजते की काय असे सध्याची प्रकरणे बघता वाटू लागते !
भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी जो अधिकारी नेमावा लागतो, चीफ व्हिजिलन्स कमीश्नर , त्याच्या नेमणुकीचेच घ्या. आता मनमोहनसिंगासारख्या अनुभवी गृहस्थाला तेव्हाच कळले असणार की ज्याच्यावर पूर्वीचे काही खटले अजून चालू आहेत व ज्याच्याबद्दल विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज ह्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यालाच नेमण्याची एवढी काय आवश्यकता आहे. पण टाळी फक्त ई-टाली च देऊ शकतात ह्या नियमाप्रमाणे सोनिया म्हणतील त्यालाच नेमावे लागते. म्हणजे मनमोहन सिंगांनी दाखवून दिले आहे की टाळी साठी इटालीच आवश्यक आहे !
बरे सोनियांना तरी हा थॉमसच का हवा आहे ? तो ख्रिश्चन म्हणून तर नक्कीच नाही. तर तो ऐकण्यातला असणारा राहणार आहे अशी दाट शक्यता आहे. कारण नाही ऐकले तर त्याच्याविरुद्धच्या केसेस आपल्याकडे आहेतच की ! आता ई-टालीचे ऐकणारा असाच माणूस हवा तर त्याला ई-टाली पडणार !
ऐकण्याची मात्तब्बरी का़, तर तसेच भानगडीचे आपले व्यवहार ना ! आता सुब्रण्यम स्वामीच म्हणताहेत की ६० टक्के पैसा आपल्या बहिणींना पोचला आहे तर न जाणो कोणाच्या हाती हे गुप्त नंबर लागले तर नसती आ़फत ! सर्व कारभार सुरळीत झालेला नाही हे तर मनमोहनसिंगानाही ठाऊक आहे. कारण म्हणूनच ते राजाला पत्राद्वारे तुम्ही असे करायला हवे होते असे सांगत आहेत. बरे आत्तापर्यंत आपण सर्व कारभार कसा एका हाती ठेवलेला आहे ! निवडणुकीच्या सभा सुद्धा आपण आपल्याशिवाय इतरांना घेऊ देत नाही. ते माणिकराव वेडयासारखे अनावधानाने म्हणाले असतील पण सर्व वसूली आपल्या एका हातीच आपण ठेवली ना ? तर मग टाली सुद्धा एका ई-टालीनेच वाजली पाहिजे !
जेव्हा आपल्याला आजूबाजूला गोष्टी दिसायला लागतात तेव्हा मग ती गोष्ट अगदी सिद्ध झालेली आहे असे आपण म्हणायला हरकत नाही. जसे समजा आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्यात बहुतेकांची मुले अमेरिकेत असतील तर खूप भारतीय अमेरिकेत गेलेले आहेत ह्या बातमीसाठी वेगळे तपशील जरूरीचे नसतात. तसेच आमचा एक शेजारी नुकताच युरोप दौर्‍यावरून आला तेव्हा सांगत होता की काय हो हे ई-टालीयन लोक, तिथे आमचा गाईड म्हणत होता की आम्ही जगच जिंकणार आहोत, तुमचा देश तर आमचीच बहू हाकीत आहे ! आता वेगळे प्रमाण नकोच. द्यायची तर ती द्या ई-टाळी, एका हातानेच !
arunbhalerao67@gmail.com