marathi blog vishva

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

जातीच्या लेखकाला, जातीचा पद्मश्री !
नेमाडेंना पद्मश्री मिळाल्याबद्दल काय वाटते ? असे जे विचारतात, त्यांना सांगावेसे वाटते की, प्रथम त्यांनाच काय वाटतेय ते बघूया. आता त्या थोर थोर मिशीतले, ह्या मिशाने ऐकायला मिळणार, असे वाटून गर्भगळित व्हायचे कारण नाही. कारण प्रत्येक दृष्ट्या पुरुषांसारखे त्यांनी, हे देशीवादी परंपरेने मागेच सांगून ठेवले आहे. कसे ते पहा: (टीकास्वयंवर पृ.३८३) "एकतर राष्ट्रीय पारितोषिकं ही कंपूशाहीतून निर्माण होणार्‍या दोनचार मूर्ख माणसांच्या मर्जीवर ठरत असतात."
कंपूशाही, दोनचार मूर्ख माणसं, असे कळीचे शब्द ऐकून भालचंद्र मुणगेकरांना वाटले असेल ह्याला "मागचे" कळले की काय ? तरी बरे की सिमल्याच्या शिष्यवृत्तीचे मीच जमवून आणले होते, ते हा विसरला की काय ? मग राडीया टेप्स कोणी लीक केल्या ह्या चालीवर ते प्लंबरसारखे लीक हुडकू लागले. तोच त्यांना राष्ट्रपतीभवनातून फोन आला की, "अहो आमच्या त्या ह्यांचे काही करा बरं !"
आता महाराष्ट्राचा कोटा, यादी, केव्हाच संपली असताना, आता बाई कोणाचे सांगताहेत बरे ? एकच काम अनेक जणांनी वाटून घेण्याच्या तीळ-संस्कारा प्रमाणे, बाईंनी विलासरावांनाही निरोप दिला. विलासरावांना कळेना की एवढा काय प्रॉब्लेम त्यात ? आपण घालू तो आदर्श ! मग कळले की महाराष्ट्राच्या कोट्यात, साहित्याच्या जंत्रीत, बाईंच्या पसंतीचे नाव काही नव्हते. ते राहिलेच.
विलासराव गेले शिंद्यांकडे. शिंद्यांनी धूर्तपणे विचारले की बाई एक्झॅक्टली काय म्हणाल्या ? आता "अहो आमच्या त्या ह्यांचे काही करा बरं!" ह्यातून अर्थ काढायचा होता. शिंदे तसे कशातूनही "अर्थ" काढण्यात पटाईत. ते म्हणाले बाई म्हणाल्या "आमच्या त्या ह्यांचे", म्हणजे कोणी लेवा-पाटील असणार. कोण बरं ? लेवा पाटील म्हणतात की मूळचे पाकीस्तानातल्या पंजाब मधले, लाहोरचे. आता त्या अफझल गुरूचा कोणी आहे की काय ? काही नेम नाही ! जरा मोघम चौकशी करू. आधी दरवानाला विचारतात, कौन मुसलमान हौ क्या ? दरवान हिंट देतो, नही जी, हिंदू ही है !
तेव्हढ्यात मुणगेकर म्हणतात अहो "हिंदू"म्हणजे नेमाडे असतील. कारण तेच एकमेव लेवा आहेत मराठीत, बहिणाबाई नंतर !
विलासराव म्हणतात की उगाच रिस्क घेऊ नका. मॅडमनी सांगून ठेवलेले आहे की बाईजींवर उगाच प्रेशर येऊ देऊ नका. त्या आपल्या अफझल गुरूचे पाहताहेत ना, मग त्यांच्या एका हिंदू चे आपण पाहू शकत नाही का? चला जरा प्रयत्न करू ! मुणगेकर, काय आहे हो हे हिंदू ? त्यावर मुणगेकर म्हणतात की तसे साहित्य अकादेमीला सांगितलेले होते... पण अजून त्यांनी काही पुरस्कार दिलेले नाहीत. तेव्हा बाईंना आत्ताच काही करायचे असेल... तसे हे लेवा पाटील मूळचे पंजाब, पाकीस्तानातल्या लाहोरचे. मग विलासराव माहीती काढतात की पंजाबची लिस्ट झाली का फाइनल.? झाली ! हरयाणाची ? ती अजून बाकी आहे. असं म्हणता ? मग काही प्रॉब्लेम नाही. नुकतेच विश्वास पाटिलांनी नाही का सांगितले की पानीपतानंतर भाऊ वगैरे मंडळी हरयाणातच होती व तिथे त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते लोक चालीरीती, फेटा वगैरे मराठी वळणाचाच बांधतात. आपण त्यांच्याच फेट्याला हे लचांड बांधू .
अफजल गुरूच्या बदल्यात जमले म्हणायचे की !
तुम्हाला वाटेल का उगाच जात काढताहेत अशा वेळी ? तर तेही नेमाडेंनीच शिकविले म्हणावे लागेल. जात काढण्यात काय संकोच ? म्हणूनच तर त्यांनी "हिंदू" त ज्ञानेश्वरांची व रामदासांची जात आरामात काढली आहे. कुणब्यांचीही काढली आहे. एवढेच काय सिद्धार्थ गौतमालाही दूषणे दिली आहेत. शिवाय अशा जाती काढून त्यांनी वेळोवेळी आदर्श घालून दिले आहेत. जसे:( टीकास्वयंवर पृ.३७९ ):"आमच्या वेळी साधना होती...आज साधना ही ट्रस्ट समाजवादी चित्पावनांनी बुडवली. केसरीच्या सिंहाला गवत खायला लागलं. सेवादलातली समाजवादी माणसं कटटर जातीयवादी निघाली." ( इत:उप्पर ते अभिमानाने म्हणतात की त्यांना फक्त ( नशीब, फकत, नाही ! ) साने गुरुजी भावतात व त्यांनी साधनेत एक वर्ष नोकरीही केली आहे. ).
खरे तर २००१ साली महाराष्ट्र फौंडेशनने नेमाडेंना जीवन-गौरव पुरस्कार दिलेला होता. म्हणजे ते तेव्हाच बक्षीस मिळालेले लेखक झालेले होते. त्यांनी इतर लेखकांना आदेश दिला आहे तो असा: "अशा बक्षीस न मिळालेल्या थोर लेखकांच्या यादीत बसण्याचा प्रयत्न करावा, असं मी चांगल्या लेखकांना सांगेन. कारण बक्षीस मिळालेल्या लोकांच्या यादीत बसण्यापेक्षा ते न मिळालेल्या लेखकांच्या यादीत जाऊन बसणं अर्थातच सोपं असतं." ( टीकास्वय़ंवर पृ. ३८४ ). ३५ वर्षात हिंदू ने त्यांना इतकं पिडलेलं दिसतं की त्यांनी स्वत: कुठल्या यादीत बसायचं हेच ते विसरले असावेत ! किंवा मग विद्रोह भावला असावा ! आदत से मजबूर !
तर असा जातीच्या लेखकाचा जातीचा किताब !

-----------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा