marathi blog vishva

सोमवार, २७ डिसेंबर, २०१०

नारदाची कळ----११
जगतगुरू कोंड देव !
जरा विचार करून पहाल तर इतिहास-तज्ज्ञाशिवाय तुम्हाला पटेल की दादोजी कोंड देव हे शिवाजीचेच काय सगळ्या जगाचेच गुरू आहेत. जगतगुरू !
संभाजी ब्रिगेड पासूनच बघा. ह्यांच्या निडर कार्यकर्त्यांनी मागे जे भांडारकर संस्थेत घुसून शौर्य दाखविले त्याचे खरे श्रेय व प्रेरणा कोणाची ? तर आब दवडणार्‍या आबांची ! राष्ट्रवादीची. कशी ? इतर कोणत्याही सरकारने ह्यांना कोंडले असते तुरुंगात. पण ह्यांचेच कोंड देव ( इतने बडे शहर मे ऐसे हादसे अक्सर होते रहते है--फेम ! ) ह्यांच्याकडे कानाडोळा करते झाले. म्हणजे गुरू झाले कोंडदेव, व तेही दादागिरी करणारे दादोजी !
यशवंतराव चव्हाणांच्या स्मृती निमित्त पवार साहेबांनी एक फार मौलिक निरिक्षण नोंदवले की एवढे आयुष्य काढून यशवंतरावांची वैयक्तिक मालमत्ता किती ? तर अवघी, एक दोन लाखाची. जे पवार साहेब म्हणाले नाहीत ते "आणि माझी ?" ते आपण म्हटले तर ? ह्यांच्याही सर्व प्रगतीचे श्रेय कोणाला ? तर कोंड देवांना ! म्हणजे कोण ? तर कुटुंबाची माया, प्रकृती, ह्यांना कोंडते ! शेती परवडत नाही, कर्ज माफी देऊ नये, कांदा अजून महागणार, परदेशात शेती करा असे असंख्य उदगार जे तोंड काढते त्यालाच कोंडणारा हा कोंडदेव रोग ! दर महिन्या दोन महिन्यातून त्याला डागण्या मिळतात !
कुटुंबाची माया ही फार मोठी कोंडणारी देवता आहे. अशोक चव्हाणांना विचारा ! बाकीचे सर्व पचले आणि नेमके नातेवाईकांच्याच आदर्श घरांनी घरघर लावली. इतके करूनही वखवख थांबत नाही. ही थांबवायला एकच देव समर्थ आहे व तो म्हणजे कोंड देव ! त्याला शिवाजी पासून कापून काढला तर आता तो कोणाला का सोडील ?
सर्व विश्व हे एक खेळाचे मैदान आहे व सर्व पैसा-अडका हा एक पोरखेळ आहे असे वाटणार्‍या वैमानिकाचे मनसुबे हवेत झेप घेत असतात. त्याला एकमेव भेव आहे ते कोंडण्याचे, कोंड देवाचे ! तरच तो जमीनीवर येणार !
क्षणात ब्रिगेड बनणारी जात लगेच मागासलेली बनून आरक्षण मागू पाहते, सत्ता काबीज करण्यासाठी इटालियन व्यक्ती पंतप्रधानपदी नको म्हणत म्हणत शेवटी त्यांच्यासमोरच कण्हत कण्हत उभी राहते आणि ह्या सगळ्या नाट्याला भूलून जर जनता ह्यांनाच निवडून देत असेल तर जनतेलाही असेच कोंड देव लखलाभ होतील ! जय जगतगुरू कोंड देव !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा