marathi blog vishva

शनिवार, ३ मार्च, २०१२


होळीच्या नव्या बोंबा !
१)     होळी रे होळी, पुरणाची पोळी !
    यूपीच्या खेळीत, राहूल दाढी चोळी !
२)    होळी रे होळी, पुरणाची पोळी !
    सोनियाच्या साडीवर, मायाची चोळी !
३)     होळी रे होळी, पुरणाची पोळी !
    राहूलच्या झोळीत, मुसलमान लोळी !
४)    होळी रे होळी, पुरणाची पोळी !
    राहूलच्या यूपीत, मेली जनता भोळी !
५)     होळी रे होळी, पुरणाची पोळी !
    फाटली फाटली, कृपाची झोळी !
६)    होळी रे होळी, पुरणाची पोळी !
    कृपाच्या दांडीवर, कॉंग्रेसची चोळी !
७)    होळी रे होळी, पुरणाची पोळी !
    नाशिकची द्राक्षे, आंबट झाली !
८)     होळी रे होळी, पुरणाची पोळी !
    साहेबांच्या गाली, हाताची टाळी !
९)    होळी रे होळी, पुरणाची पोळी !
    पृथ्वीच्या जबड्यात, आदर्शाची जाळी !
१०)    होळी रे होळी, पुरणाची पोळी !
    अण्णांची कढी, झाली शिळी !
११)    होळी रे होळी, पुरणाची पोळी !
    सिबलची तिब्बल, लीलावात बोली !
१२)    होळी रे होळी, पुरणाची पोळी !
    राहूलच्या यूपीत, सग्ळे हात चोळी !
१३)    होळी रे होळी, पुरणाची पोळी !
    यूपीच्या गाडीत, मुलायम हात चोळी !
१४)    होळी रे होळी, पुरणाची पोळी !
    राहूलच्या गाडीत, सग्ळ्यांची मोळी !
१५)    होळी रे होळी, पुरणाची पोळी !
    कृपाच्या गाडीत, सडकी केळी !
१६)    होळी रे होळी, पुरणाची पोळी !
    कोर्टाच्या पंचपात्रात, कृपाची पळी !
१७)    होळी रे होळी, पुरणाची पोळी !
    राणेच्या गाडीत, न्युक्लिअर केळी !
१८)    होळी रे होळी, पुरणाची पोळी !
    कॉंग्रेसच्या राज्यात, बंदुकीची गोळी !
१९)    होळी रे होळी, पुरणाची पोळी !
    कॉंग्रेसच्या हाती, पैसा घोळी !
२०)    होळी रे होळी, पुरणाची पोळी !
    आव्हाडाच्या कवाडी, कडीची पाळी !

   

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२



नारदाची कळ----२१
राहूल काय फाडतोय !
    ह्या निवडणुकीच्या प्रचारसभात प्रियांका अगदी तोडतीय. आणि सुंदर तर काय दिसतीय ! ती तोडतीय, तर राहूल फाडतोय ! सोनियाला अगदी धन्य वाटावे असेच हे चित्र आहे. आपण आपल्या देशाला भारत-माता म्हणतो ते सार्थच वाटावे असे देखावे आजकाल पहायला मिळताहेत. स्टेज वर सोनिया-माता बसली आहे. बाजूला प्रियांका आहे. ती अगदी इंदिराजींसारखीच दिसते आहे. त्यांचीच हेअरस्टाईल. स्टेजवर आरामात पहा तीन तीन पिढया ! त्यात परत ती इतकी खेळकर आहे की आपल्या मुलांना धक्का मारते, आईचे गालगुच्चे घेते. सोनिया मातेचा संसार पहा कसा देशाच्या संसारात एकरूप झाला आहे. जणु काही जिवतीचेच चित्र स्टेजवर रेखाटलेले असे. आपल्या बाळांचे हे प्रताप पाहून आता सोनियांना नि:श्चिंतपणे केमोला जायला हरकत नाही !
    राहूलची तडफ व दाढी तर काय छान दिसते आहे ! दाढी सुद्धा अशी दाट की कोणालाही त्याच्या मर्दानगीची झलक साक्षात दिसावी. आणि आजकाल तो भाषणही काय जोशात देतो आहे. लोकसभेत कसे लिहिलेलेच वाचावे लागते. आता निवडणुकीत तो अगदी त्वेषाने बोलतो आहे. तोंडपाठ भाषण. परवा तर त्याने कमालच केली. म्हणाला मुलायम-सिंग, मायावती व भाजप ह्यांनी काय नुसती आश्वासनेच दिली आहेत. काय आहेत ही आश्वासने ? असे विचारत राहूल एक चिठ्ठी काढतो. ती वाचत म्हणतो, बिजली देंगे, नोकरी देंगे, बेरोजगारी-भत्ता देंगे वगैरे. असली नुसती आश्वासने काय कामाची ? आणी त्वेषाने राहूल ती चिठ्ठी फाडून, तुकडे तिथेच समोर फेकतो.
    त्या दिवशीचे हे त्वेषाचे भाषण झाल्याबरोबर बिचार्‍या राहूलवर एक वेगळाच प्रसंग गुदरला. त्याला रात्री एक सायबर कॅफे हुडकून "शादी.कॉम" वर लॉग-इन करावे लागले. कारण सोनियाजींनी राहूलसाठी त्यावरून एक शॉर्ट-लिस्ट तयार केली होती व गुप्त हेरांकरवी ती राहूलला स्टेजवरच पोचती केली होती. त्यात सहा मुलींची नावे, ई-मेल व पासवर्डस्‌ दिलेले होते. आता ह्याने त्वेषाच्या आवेशात नेमकी तीच शॉर्ट-लिस्ट फाडली. आता त्या मुलींची हा डेट कशी घेणार व निवडणूक झाल्यावर परदेशी त्यांना कसा भेटायला जाणार ? सॉरी, सॉरी....आता ती शॉर्ट-लिस्ट शादी.कॉम वरूनच काढायला पाहिजे ! त्यासाठीच तर राहूल शोधतोय सायबर-कॅफे !

------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
-----------------------------------------------------------------

  

गुरुवार, १ डिसेंबर, २०११




---------------------------------------------------------------------------
नारदाची कळ---१९
एफ डी आय----फाईन्ड डॉलर्स इन इन्डिया
    राजकारण कोणी जनसेवेसाठी करीत नसते. राजकारण असते पैसे कमावण्यासाठी. म्हणूनच तर एक निवडणूक लढवायची तर आजकाल दहा बारा कोटी तरी लागतातच. राजकारणी जेव्हा लाचलुचपतीत पकडल्या जातात तेव्हा कमीत कमी दहा बारा हजार कोटी रुपयांची तरी अफरातफर असावी लागते. आजकालचे ते प्रमाणच झाले आहे. २-जी घोटाळा एक लाख कोटींचा. फुटकळ आजकाल कोणी खातच नाही.
    असे असताना फुटकळ व्यापारात सरकार दरबारचे एवढे का म्हणून लक्ष गेले असावे ? वॉलमार्ट ५१ टक्के गुंतवणूक घेऊन येईल, तेव्हा ४९ टक्के गुंतवणूक तर इथल्यांचीच लागेल ना ? त्यांच्याशी जे हातमिळवणी करतील त्यांना मग नफाच नफा मिळणारा आहे. आता त्यांच्याशी जे कोलॅबोरेशन करणार ते कोण असणार आहेत. ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी पैसा मुबलक आहे अशाच कंपन्या आणि मोठे लोक. राजकारण्यांकडे जर काही हजार कोटी असतील तर ते कुठे गुंतवतील ? वॉलमार्ट चांगला धंदा आहे की ! त्यात आरामात गुंतवता येतील. नुसते वॉलमार्ट येणार म्हटले की इथल्या रिटेल कंपन्यांचे शेअर्स लगेच एका दिवसात १७ टक्क्यांनी वाढले त्यावरून वारे कोणत्या दिशेने वाहते आहे ते कोणालाही कळावे.
    २-जी घोटाळ्यात बलवाने कनीमोळीच्या कंपनीला २०० कोटी रुपये बिनतारणाचे कर्ज दिले होते. आता हे पैसे त्यांनी परत केले असे दाखवले तरी २०० कोटी रुपये कोणाकडे तरी ज्यादा झालेले फिरत आहेत हे तर नक्कीच. सोनिया गांधींचा जावई, वढेरा, ह्यांना दिल्लीची एक बांधकाम व्यवसायातली कंपनी, डीएलएफ, २५ कोटी रुपये बिनतारणाचे कर्जाऊ देते, हे पाहिल्यावर त्यांच्याकडे निश्चितच असे अजून कित्येक हजार कोटी रुपये जमा झालेले असतील. ते कुठे बरे गुंतवणार ? त्यांना वॉलमार्ट चांगलेच की ! कदाचित डॉलरमध्येही  त्याचा लाभ घेता येईल.
    एवढे हे प्रकरण महत्वाचे असताना, लोकसभा चालली काय अन्‌ न चालली काय ? आठ दहा दिवसात काही तरी मार्ग निघेल किंवा फार फार न्युक्लियर बिलासारखा काही मतांचा खर्च करावा लागेल. पण गुंतवणुकीची इतकी चांगली संधी राजकारणी कशाला सोडतील ? काही काळजी करू नका, सर्वांची नीट व्यवस्था लागेल !

--------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
-------------------------------------------------------------------

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०११

सामूहिक लोकपाल उत्सव !
---------------------------------------------
लोकमान्य अण्णा हजारेंनी सामूहिक लोकपाल उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या सिव्हिल सोसायटीचा जन-लोकपाल पाहून भारताच्या लोकसभेनेही लोकपाल बसवण्याचे ठरवले. आता विरोधी पक्षाला अगदी ५२ फुटी उंचीचा लोकपाल हवा होता, तेव्हा त्यांनी उंची तोलून धरणारा प्लॅस्टर ऑफ पॅरीसचाच लोकपाल बसवायचे ठरवले. विरोधी पक्षाचा ह्यात डाव असा होता की प्लॅस्टर ऑफ पॅरीस मुळे हव्या त्या साचात लोकपालाला घडवता येईल. कॉंग्रेसला मात्र पर्यावरण-मैत्रीचा, मातीचा, लोकपाल हवा होता. त्यांच्या मते तो इथल्या मातीचाच असल्याने लवकर विरघळेल. शिवाय सर्वांचेच पाय मातीचेच असल्याने, लोकपालही मातीचाच असलेला बरा. एक हूल म्हणून राहूल म्हणाला खरा की लोकपालाचे आपण एक कायमचे स्वतंत्र पीठच स्थापू. पण ते नंतरचे ! ( विरोधी पक्षाला एरव्ही सोनियांचे परकीयपण खुपते पण लोकपाल मात्र त्यांना पॅरीसच्या मातीचा का हवा ? ). अण्णांचा लोकपाल उजव्या सोंडेचा असेल तर इतरांचा डाव्या सोंडेचा ! श्रीमती अरुणा रॉय ह्यांना मात्र सगळ्यांचा मिळून केलेला लोकपाल, झाला तर, पाहिजे होता. आता सगळ्यांचा मिळून लोकपाल कसा असेल ? ---पोट विशाल व सैलसे असावे म्हणून लवचिकतेचे, रबराचे असावे, हात लंबे असावेत ( कनून के हात लंबे होते है ना ? ), ह्रदय कणखर लोखंडाचे असावे व पाय मातीचे असावेत, असे सामूहिकपणे लोकपालाचे रूप ठरले.
लोकपालाला जनजागृतीच्या क्रांतीच्या, लाल रंगाचे, फार महत्व असल्याने गणपतीप्रमाणेच ह्याला लाल रंगाची फुले वहावीत असे ठरले. गणपतीला जशा दुर्वा प्रिय असतात तशा लोकपालाला कॉंग्रेस गवताच्या दुर्वा चढवाव्यात असा प्रस्ताव ठेवण्यात आला. लोकपालाचे वाहन म्हणून ( गणपतीचा जसा उंदीर ) टोपी परिधान केलेले अण्णा नियुक्त करण्यात आले. रूढी अशी की लोकपाला जवळ जाण्याआधी लोकांनी बाहेर बसवलेल्या अण्णांच्या कानात हळूच आरोप पुटपुटावेत. जसे गणपतीच्या दर्शनार्थ आलेले भक्त आपली करुणा उंदीराच्या कानात सांगतात व ती गणपतीला पोचते तशीच ही व्यवस्था असेल. उदाहरणार्थ; तक्रारपती अण्णांच्या कानात पुटपुटू शकतील.." अण्णा, शरदजींचे लवासामध्ये इतके झाले आहेत आता !..". किंवा "अण्णाजी, सोनियाजींचा बदललेला स्विस नंबर आहे एकदोनतीनचार...".
प्रत्येक जण लोकपाल आपापल्या सोयीनुसार बसवू शकतील. बहुदा कॉंग्रेस-वाले दीड दिवसाचा ठेवतील, तर भाजप-वाले पूर्ण बारा दिवसांचा. लोकपालांच्या आरती नंतर खिरापत आपापसात वाटून घेण्याची गणपतीची प्रथा इथेही चालू ठेवावी लागेल. राज्याराज्यात छोटे लोकपाल म्हणजे लोकायुक्त बसवावेत. हे छोटे लोकपाल पालीकेच्या हौदात विसर्जित होतील, तर मोठे जन-लोकपाल भव्य अशा सागरात ( जन-सागरात ) विसर्जित होतील. लोकपालाबरोबर गौरी बसवायच्या असतील तर किरण बेदी-मेधा पाटकर, मायावती-ममता, वा अरुणा रॉय-सोनीया अशा ज्येष्ठा-कनिष्ठा जोड्या बसवता येतील. रोज लोकपालाची खाली दिलेली आरती करण्यात येईल व टेबलाखालून सर्वांना खिरापत वाटण्यात येईल.
कुठल्याही सामूहिक दैवताच्या आख्यायिका असाव्या लागतात तरच ती दैवते चांगली फोफावतात असे आढळून आल्याने, सामूहिक लोकपालाच्या खालील आख्यायिका अधिकृत समजल्या जातील :
१) एकदा सर्व लोकपाल शर्यत लावतात. प्रत्येक लोकपालाकडे एक सरकारचा घडा दिलेला असतो. त्यात त्याने एक भ्रष्टाचाराचा अपराध झाला की एक खडा टाकायचा. ज्याचा घडा लवकर भरेल व जो जगाला तीन प्रदक्षिणाही घालील तो लोकपाल विजयी घोषित करण्यात येईल. अण्णांचा जनलोकपाल खूप हुशार असतो. तो गुपचूप महाराष्ट्रात येतो, रस्त्यावरची उखडलेली खडी घडयात टाकतो व राळेगणसिद्धीला तीन प्रदक्षिणा घालतो. त्यालाच विजयी घोषित करतात. कारण राळेगणसिद्धी हेच त्याचे जग असते !
२) एकदा न्हाणीघरात सोनियाजी न्हात असतात. ( हिंदी व्हर्शन: एक बार सोनियाजी भारतकी गंगा न्हा रहे थे ! ). बाहेर रखवालीला त्या आपल्या विश्वासातल्या मनमोहनाला बसवतात. ( राहूल अजून तयार झालेला नसतो ). तेव्हढ्यात तिकडून एक "जनता" येतो. ( अरे, ये जनताही खरी मालिक है, ये तो उसके सेवक है !--- इति रामलीलावरचे अण्णा .). तो म्हणतो मला बाईंना भेटायचेय. मनमोहन मना करतो. "जनता"ला राग येतो. तो मनमोहनाशी लढतो. त्यात मनमोहनाचे डोके उडते. तेव्हढ्यात बाई बाहेर येतात व "जनता"ला म्हणतात, अरे हा तर आपलाच मनमोहन होता ना ! आता तर हा डोक्यानेच गेला. ह्याची पगडी आता कशी बांधायची ? सिर सलामत रहता तो पगडी पचास ना ! मग "जनता" म्हणते काही काळजी नको, आपल्या कडे भरपूर पांढरे हत्ती पाळलेले आहेत. त्यांच्याच एकाचे सिर लावू यात. तर तसे केल्यावर मनमोहनाचा लोकपाल तयार होतो व तोच सध्या आपल्यावर देखरेख करीत आहे बरे !
गणपतीला जसे मोदक प्रिय असतात, तसे लोकपालाला मिडीया-बाईटस्‌ प्रिय असून त्यांचे किमान २१ चॅनेल्स वरचे बाईटस्‌ लोकांना वाटावे लागतील. सामूहिक गणपतीच्या जशा आरोळ्या असतात तशा लोकपालांच्याही गर्जना असतील :
एक दोन तीन चार , सगळीकडे भ्रष्टाचार !;
किंवा एक दोन तीन चार, लोकपालांचे भय भय फार ! ;,
किंवा लोकपाल गेले कमीटीला ( स्टॅंडिंग कमीटीला ), चैन पडेना आम्हाला ! ;,
लोकपाल म्होरं या, पुढच्या वर्षी लौकर या ! ;,
किंवा लोकपाल गप्पा--थोर या ! ;,
किंवा लोकपाल गप्पा--बोर या ! ;,
लोकपाल गप्पा--घोर या ! ;.
सामूहिक लोकपाल उत्सवात ( अण्णा जसे "भारत माता की जय" असे आवाहन करतात तसेच, पण इस्लामप्रमाणे देशाला वा आईला देवाचा दर्जा नामंजूर असल्याने ) निधर्मी घोषणा असेल :
"भारत खाता ही-- हय !" किंवा "भारत जिताही--- नय !" किंवा "भारत खाता भी-- लय !" किंवा "भारत की नीती भी-- गय !"

-----------------------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
---------------------------------------------------------------------------------------
लोकपालाची आरती:
नोकरशहांना, खासदारांनो, वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी ऐट लोकपालाची
सर्वांगी सुदूर अटी भ्रष्टाचाराची
कंठी आवळे फास कारवाईची
जयदेव जयदेव जय लोकपाला, दर्शन मात्रे जन धन्य हो झाला

जय देव जय देव जय लोकपाला
तुमच्याच्याने देश स्वच्छ हो झाला
जय देव जय देव ... ||
तुमच्या फटक्याने घाबरले सारे
सांगती एकमेका सावध व्हा सारे
काळ्या पैशाने हो पोबारा केला
जय देव जय देव... ||
लोकपाल वंदूया लोकपाल भजूया
विसर्जनाची वाट पाहूया
संपले दहा दिवस खाऊया चला
जय देव जय देव ... ||

शनिवार, १६ जुलै, २०११

------------------------------------------------------------------------------------

नारदाची कळ----१८
राहूल गांधी : "सरकार सगळे आतंकवादी हल्ले रोखू शकत नाही, ९९ टक्के रोखू शकते पण १ टक्का हल्ला होऊ शकतो !"
श्रीमती सोनिया गांधी ह्या राहूल गांधीच्या जन्मावेळीच्या बाळंतपणात जरा अवघडल्या होत्या. एका व्हायरसने त्या खूपच आजारी पडल्या होत्या. त्या दरम्यान आलेल्या तापामुळे बाळ राहूलला इजा होणार होती. ताप जर लवकर कमी झाला नाही तर बाळावर परिणाम होऊन ते मेंटली रिटार्डेड निघण्याची शक्यता होती. डॉक्टरांनी सगळ्या देशोदेशीच्या तज्ज्ञांना बोलावले होते. एका इटालियन डॉक्टरकडे एक औषध होते खरे, पण अजून त्याच्या सर्व तपासण्या झालेल्या नव्हत्या. औषधाला अजून मंजूरी मिळालेली नव्हती . पण दुसरा काहीच इलाज नव्हता . बरीच खलबते झाली. शेवटी श्रीमती सोनिया गांधींना पूर्ण कल्पना देऊन ते औषध द्यावे असे ठरले. त्यांनी विचारले ह्यात धोका काय आहे ? डॉक्टर सांगू लागले ९९ टक्के केसेस मध्ये मेंटल रिटार्डेशन रोखण्यात यश येऊ शकेल, फक्त एक टक्का केस मध्ये....सोनिया गांधींना इतके दुखत होते की त्या म्हणाल्या...हरकत नाही...द्या एकदाचे लवकर...आणि यथावकाश त्या बाळंत झाल्या . बाकी सर्व ठीक होते पण बाळाची बुद्धीची वाढ होत नव्हती. त्यावर सोनिया ( व राजीव व इंदिरा ) म्हणाल्या काही हरकत नाही....ह्या १ टक्केवाल्याला मी भारतात वाढवीन व पायलट नाही तर नाही, पंतप्रधान तरी करीनच !
हा किस्सा ऐकल्यावर लगेच मनमोहनसिंगांची इतिहासकार मुलगी शोध घेऊ लागली की मनमोहनसिंग ह्यांचा जन्म कुठे झाला होता, डॉक्टर कोण होते, व ते औषध दिले होते का ?

---------------------------------------------------------------------------

शुक्रवार, ३ जून, २०११

नारदाची कळ---१६
स्वर्ग का नरक ?

आजकाल एक नवीनच चर्चा सुरू झाली आहे. स्वर्ग व नरक हे खरेच आहेत की नाहीत ? ह्यावर प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हे शास्त्रीय निर्वाळा देतात की असे काही नसते. ह्याच विषयावर श्री.गिरिश कुबेर ह्यांनी लोकसत्तेत आजच एक लेख लिहिलेला आहे. त्यांचा "अन्यथा"सदरातला स्टीफन हॉकिंगवरचा लेख छानच आहे. पण मुळात कोणताच विचार काळे-गोरे ह्या काटेकोर रंग-परीघात बसणारा असत नाही . म्हणूनच तर गल्लतीची शक्यता कायम राहते .
ज्या स्टीफन हॉकिंगचे आपण गोडवे गातो त्याच्या, फार लोकांना माहीत नसलेल्या काही बाबी, त्याच्या बुद्धिमत्तेच्या प्रगल्भतेनंतर, जरा काळजीने पहा. ह्याची बायको इंग्रजीची प्राध्यापिका. तीन मुले व स्टीफन ह्यांचे आदर्श संगोपन करीत असताना, ह्या स्टीफन महाशयांनी ज्या विद्यार्थ्याने ह्यांच्या खुर्चीवर बोलण्याचा संगणक बसवून दिला होता, त्याच्याच बायकोबरोबर ( ही नर्स होती ) संधान जुळवले. एव्हढा गलितगात्र असतानाही, पहिलीशी घटस्फोट घेऊन तिच्याशी लग्नही केले. तरीही त्यांचे चाळे शमले नाही. एकदा हा घरात मार लागून पडलेला आढळला, एका विद्यार्थ्याने पोलिसात नेले तर बायकोने ठिकठिकाणी ओरखडे काढलेले. ज्या विकलांग शरीरात इतकी प्रगल्भ बुद्धी वसते आहे, त्याच, एकही स्नायू काम न करणार्‍या शरीराने, त्याला इतके पछाडावे ? ह्या एकाच प्रमादापायी कोणाही चित्रगुप्ताने स्वर्गाची दारे ह्याला बंद करावीत असेच हे वागणे आहे. शास्त्रज्ञाच्या शिक्कामोर्तबाने आता ह्याने म्हणावे की स्वर्ग किंवा नरक असे काही नसते, तर ते शास्त्रीय किती व मानस-शास्त्रीय किती हे कळणे अवघड आहे.
आपला असा समज दिसतो की माणसाच्या ज्या नैसर्गिक उर्मी असतात त्या रास्तच असतात. पण जरा विचार केलात तर दिसेल की ह्या उर्मींना माणसाला कायम एका शिस्तीच्या स्वाध्यायाने पारखून घ्यावे लागलेले आहे. नर-मांस-भक्षणाचे उदाहरण घ्या. प्रथम आदिमानव नरमांसभक्षण करीत असे. त्या उर्मीला कठोर नीती-नियम लावून जेव्हा त्याने हजारो वर्षे स्वत:लाच पटवले, तेव्हाच ही उर्मी आताशी लोप पावत आली आहे. ही कठोर स्वाध्यायाची शिस्त बाळगणे ही स्वर्गाची एक प्रकारची हमीच म्हणायला हवी. मातागमन, बहिणीशी संग ह्या उर्मी ( जर कुणाला आल्याच तर ) शिस्तीने निकामी करण्यासाठीच कुठलाही समाज, आई-बहिणीवरच्या शिव्या निर्माण करत असतो. व तरीही तुम्ही त्या उर्मींबरोबर वाहवलात तर ते नर्कात पडल्यासारखेच आहे असे आपण समजतो. स्वर्ग वा नरक ह्या कल्पना ह्या शिस्तीसाठी आवश्यकच असतात, कुठल्याही धर्मात . तुमच्याच कार्यक्षेत्रातले उदाहरण घ्यायचे तर आजही अशी वर्तमानपत्रे आहेत ज्यात अग्रलेख चार ठिकाणी चार तुकड्यात दिलेला असतो. तुमच्यासारख्यांची शिस्तच मग व्यवस्थित अग्रलेखाला त्या वर्तमानपत्राला नरकातून काढते . स्वर्ग करते.
साहित्यात कविता हा प्रकार सहज स्फूर्तीचा आपण मानतो, व म्हणूनच न जाणो ह्या सहज-स्फूर्तीमुळे ह्या साहित्यप्रकारात काही गहिरे सत्य, मूल्य, असावे असे समजून त्याला चांगलाच मान देतो. पण कुठल्याही कवीला, भाषेच्या शिस्तीतून ( शब्द, अर्थ, वृत्त वगैरे ) ह्या स्फूर्तीला न्यावेच लागते. असे नेताना जर त्याने कधी "झपूर्झा" असा कधी न ऐकलेला शब्द वापरला असेल तर मग टीप द्यावी लागते की हा शब्द म्हणताना पोरी झिम्मा खेळताना जो आवाज होतो ( झिम पोरी झिम सारखा ) तसाच आवाज होतो. मानवी स्फूर्तींना शिस्तीचा, विवेकाचा, तारतम्याचा चाप प्रत्येक प्रबुद्ध समाजाला लावावाच लागतो व तेव्हाच तो स्वर्ग होतो. मग भले असा स्वर्ग स्टीफन हॉकिंग म्हणतात तसा अस्तित्वात असो वा नसो.
आपल्याकडे काश्मीरच्या सौंदर्याची वाखाणणी करताना म्हणतात की पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो इथे आहे, इथे आहे, इथे आहे. ( अमीनोस्तु अमीनोस्तु अमीनोस्तु ). ह्याच काश्मीरात परवा दल लेकवरचा एक काश्मीरी सांगत होता की, खरे तर आमच्या श्रीनगर चे आधीचे नाव श्री-नरक असले पाहिजे ! माणसांचा जसा कायम नरकाचा स्वर्ग करण्याचा चंग असतो तसा कधी कधी ( किंवा आजकाल बहुतेक ठिकाणी ) स्वर्गाचा नरकही होत असतो. मग स्नायू हतबल स्टीफनजी, स्वर्ग-नरक, नाहीतच असे कसे म्हणावे ?

----------------------------------------------------------------------------

रविवार, २४ एप्रिल, २०११

नारदाची कळ----१५
भ्रष्टाचारावरचा नवा तोडगा: जन-लोकपाल-फंड
आत्ताशी शहाणे लोक जन-लोकपाल-बिलाचा मसूदा वाचायला लागलेत. आता बर्‍याच जणांना जाणवायला लागलेय की हे प्रकरण दिसतेय तेवढे सरळ नाहीय. कोणी सांगावे ह्या मागे कोण असेल व त्याचा लाभ कोणाला मिळेल. तर शेवटी काय, हे राजकारणी अण्णांच्या जन-लोकपाल-बिलाला बधतील असे वाटत नाही.
आता ह्यावरचा अक्सीर रामबाण उपाय माझ्याकडे आहे तो जरा ऐका: "जन-लोकपाल-फंड":
१) एक फंड तयार करायचा, "जन-लोकपाल-फंड". ह्याचे सदस्य असतील त्या त्या मतदारसंघातले सर्व नोंदणीकृत मतदार. त्यांचे बॅंकेत खाते असणार, त्यांच्याकडे मतदार ओळखपत्र असणार, युआयडी ओळखपत्र असणार.
२) लोकपाल बिलातून ज्यांना मुक्ती हवी आहे त्यांनी ह्या फंडात खालील प्रमाणे रोख रक्कम भरायची आहे. ही रक्कम भरल्यानंतर त्यांना जन-लोकपाल-संघटना एक एक्झेंप्शन सर्टीफिकेट देईल, ज्यानुसार त्यांना जन-लोकपालांच्या भावी कारवाईतून मुक्ती मिळेल ( फक्त एक वर्षासाठी ):
नगरसेवक : रुपये : १ लाख
जिल्हा परिषद सभासद : रुपये : २ लाख
विधानसभा सदस्य : रुपये : ५ लाख
राज्याचा मंत्री : रुपये : १ कोटी
राज्याचा मुख्यमंत्री : रुपये : १० कोटी
लोकसभा सदस्य : रुपये : १० कोटी
केंद्राचा मंत्री : रुपये : १५ कोटी
केंद्रातले पंतप्रधान : रुपये : २५ कोटी
३) हा जन-लोकपाल-फंड दिल्लीत एकेठिकाणी असेल. भारतातल्या सर्व ठिकाणच्या शाखात त्यात पैसे जमा करण्याची मुभा असेल. त्यात जमा झालेली रक्कम समप्रमाणात प्रत्येक मतदाराच्या वैयक्तिक खात्यावर वर्षाच्या शेवटी हस्तांतरित करण्यात येईल. जन-लोकपाल-फंडाचे ऑडिटर ( किंवा लोकसभेचे सीएजी ) किती पैसे वाटायचे ते नक्की करतील.
४) एक्झेंप्शन सर्टिफिकेटचा भाव/दर दरवर्षी, कसा निधी जमा होतो, त्यावरून ठरवण्यात येईल. समजा खूप लोक पटापट पैसे भरताहेत असे दिसले ( उदा: २८ पैकी १४ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजा पैसे भरले, तर पुढील वर्षी त्यांचा भाव/दर प्रत्येकी १० कोटीहून वाढवून प्रत्येकी रुपये १२ कोटी करण्यात येईल. असेच वाजवी दर इतर राजकारण्यांसाठी ठरवण्यात येतील. हे पैसे राजकारण्यांनी निवडून आल्यावरच भरायचे असल्यामुळे व ज्यांना जरूर असेल त्यांनीच हे भरायचे असल्यामुळे ह्याने भ्रष्टाचार वाढणार नाही. ज्यांना आपण भ्रष्टाचार करणार नाही आहोत, अशी खात्री आहे त्यांना हे खर्च करावे लागणार नाहीत. तसेच समजा एखाद्याने एखाद्या वर्षी पैसे भरले पण कोणीच त्याच्याविरुद्ध काही तक्रार केली नाही तर दुसर्‍या वर्षी त्याने पैसे नाही भरले तर चालण्यासारखे आहे. तक्रार झाल्यावरही कोणाला मुक्ती हवी असेल तर तत्काल टिकीट जसे दुप्पटीचे असते तसा त्यांना दुप्पट दंड भरावा लागेल.
५) ट्रॅफिक पोलिसांनी वसूल केलेली दंडाची रक्कम वाटून घेतली तर जसा सामुदायिक जलसा होतो त्यावरूनच ही कल्पना सुचलेली आहे. ह्यात समजा राजकारण्यांनी दंड भरायचे कमी झाले तर चांगलेच आहे. कारण त्यावरून भ्रष्टाचार कमी होतोय असेच ठरेल. शिवाय आज राजकारणी जे मोकळे सुटतात त्याऐवजी चोराची पूर्ण रक्कम नाही तर काही तरी हाताला लागेल व ते सर्वांना वाटून दिल्याने सत्कारणी तरी लागेल. नाही तरी आजकाल सबसिडी अशीच बॅकेच्या खात्यातून द्यावी अशी सूचना पुढे येतेच आहे.
६) कोणी असा समज करून घेऊ नये की जन-लोकपाल-फंड हे बेकायदा कृत्य होईल. कारण अमेरिकेत व युरोपात प्ली-बारगेनींगच्या पद्धतीमुळे त्यांच्याकडे न्यायदानाचे काम खूपच लवकर व कमी खर्चाचे होते आहे. हा फंड हा एकप्रकारचा प्ली-बारगेनींगचाच एक प्रकार आहे, जो प्रगत देशात अगदी कायदेशीर समजल्या जातोय.

---------------------------------------------------------------------------------------------