नारदाची कळ----२१
राहूल काय फाडतोय !
ह्या निवडणुकीच्या प्रचारसभात प्रियांका अगदी तोडतीय. आणि सुंदर तर काय दिसतीय ! ती तोडतीय, तर राहूल फाडतोय ! सोनियाला अगदी धन्य वाटावे असेच हे चित्र आहे. आपण आपल्या देशाला भारत-माता म्हणतो ते सार्थच वाटावे असे देखावे आजकाल पहायला मिळताहेत. स्टेज वर सोनिया-माता बसली आहे. बाजूला प्रियांका आहे. ती अगदी इंदिराजींसारखीच दिसते आहे. त्यांचीच हेअरस्टाईल. स्टेजवर आरामात पहा तीन तीन पिढया ! त्यात परत ती इतकी खेळकर आहे की आपल्या मुलांना धक्का मारते, आईचे गालगुच्चे घेते. सोनिया मातेचा संसार पहा कसा देशाच्या संसारात एकरूप झाला आहे. जणु काही जिवतीचेच चित्र स्टेजवर रेखाटलेले असे. आपल्या बाळांचे हे प्रताप पाहून आता सोनियांना नि:श्चिंतपणे केमोला जायला हरकत नाही !
राहूलची तडफ व दाढी तर काय छान दिसते आहे ! दाढी सुद्धा अशी दाट की कोणालाही त्याच्या मर्दानगीची झलक साक्षात दिसावी. आणि आजकाल तो भाषणही काय जोशात देतो आहे. लोकसभेत कसे लिहिलेलेच वाचावे लागते. आता निवडणुकीत तो अगदी त्वेषाने बोलतो आहे. तोंडपाठ भाषण. परवा तर त्याने कमालच केली. म्हणाला मुलायम-सिंग, मायावती व भाजप ह्यांनी काय नुसती आश्वासनेच दिली आहेत. काय आहेत ही आश्वासने ? असे विचारत राहूल एक चिठ्ठी काढतो. ती वाचत म्हणतो, बिजली देंगे, नोकरी देंगे, बेरोजगारी-भत्ता देंगे वगैरे. असली नुसती आश्वासने काय कामाची ? आणी त्वेषाने राहूल ती चिठ्ठी फाडून, तुकडे तिथेच समोर फेकतो.
त्या दिवशीचे हे त्वेषाचे भाषण झाल्याबरोबर बिचार्या राहूलवर एक वेगळाच प्रसंग गुदरला. त्याला रात्री एक सायबर कॅफे हुडकून "शादी.कॉम" वर लॉग-इन करावे लागले. कारण सोनियाजींनी राहूलसाठी त्यावरून एक शॉर्ट-लिस्ट तयार केली होती व गुप्त हेरांकरवी ती राहूलला स्टेजवरच पोचती केली होती. त्यात सहा मुलींची नावे, ई-मेल व पासवर्डस् दिलेले होते. आता ह्याने त्वेषाच्या आवेशात नेमकी तीच शॉर्ट-लिस्ट फाडली. आता त्या मुलींची हा डेट कशी घेणार व निवडणूक झाल्यावर परदेशी त्यांना कसा भेटायला जाणार ? सॉरी, सॉरी....आता ती शॉर्ट-लिस्ट शादी.कॉम वरूनच काढायला पाहिजे ! त्यासाठीच तर राहूल शोधतोय सायबर-कॅफे !
------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
-----------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा