marathi blog vishva

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०११

सामूहिक लोकपाल उत्सव !
---------------------------------------------
लोकमान्य अण्णा हजारेंनी सामूहिक लोकपाल उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या सिव्हिल सोसायटीचा जन-लोकपाल पाहून भारताच्या लोकसभेनेही लोकपाल बसवण्याचे ठरवले. आता विरोधी पक्षाला अगदी ५२ फुटी उंचीचा लोकपाल हवा होता, तेव्हा त्यांनी उंची तोलून धरणारा प्लॅस्टर ऑफ पॅरीसचाच लोकपाल बसवायचे ठरवले. विरोधी पक्षाचा ह्यात डाव असा होता की प्लॅस्टर ऑफ पॅरीस मुळे हव्या त्या साचात लोकपालाला घडवता येईल. कॉंग्रेसला मात्र पर्यावरण-मैत्रीचा, मातीचा, लोकपाल हवा होता. त्यांच्या मते तो इथल्या मातीचाच असल्याने लवकर विरघळेल. शिवाय सर्वांचेच पाय मातीचेच असल्याने, लोकपालही मातीचाच असलेला बरा. एक हूल म्हणून राहूल म्हणाला खरा की लोकपालाचे आपण एक कायमचे स्वतंत्र पीठच स्थापू. पण ते नंतरचे ! ( विरोधी पक्षाला एरव्ही सोनियांचे परकीयपण खुपते पण लोकपाल मात्र त्यांना पॅरीसच्या मातीचा का हवा ? ). अण्णांचा लोकपाल उजव्या सोंडेचा असेल तर इतरांचा डाव्या सोंडेचा ! श्रीमती अरुणा रॉय ह्यांना मात्र सगळ्यांचा मिळून केलेला लोकपाल, झाला तर, पाहिजे होता. आता सगळ्यांचा मिळून लोकपाल कसा असेल ? ---पोट विशाल व सैलसे असावे म्हणून लवचिकतेचे, रबराचे असावे, हात लंबे असावेत ( कनून के हात लंबे होते है ना ? ), ह्रदय कणखर लोखंडाचे असावे व पाय मातीचे असावेत, असे सामूहिकपणे लोकपालाचे रूप ठरले.
लोकपालाला जनजागृतीच्या क्रांतीच्या, लाल रंगाचे, फार महत्व असल्याने गणपतीप्रमाणेच ह्याला लाल रंगाची फुले वहावीत असे ठरले. गणपतीला जशा दुर्वा प्रिय असतात तशा लोकपालाला कॉंग्रेस गवताच्या दुर्वा चढवाव्यात असा प्रस्ताव ठेवण्यात आला. लोकपालाचे वाहन म्हणून ( गणपतीचा जसा उंदीर ) टोपी परिधान केलेले अण्णा नियुक्त करण्यात आले. रूढी अशी की लोकपाला जवळ जाण्याआधी लोकांनी बाहेर बसवलेल्या अण्णांच्या कानात हळूच आरोप पुटपुटावेत. जसे गणपतीच्या दर्शनार्थ आलेले भक्त आपली करुणा उंदीराच्या कानात सांगतात व ती गणपतीला पोचते तशीच ही व्यवस्था असेल. उदाहरणार्थ; तक्रारपती अण्णांच्या कानात पुटपुटू शकतील.." अण्णा, शरदजींचे लवासामध्ये इतके झाले आहेत आता !..". किंवा "अण्णाजी, सोनियाजींचा बदललेला स्विस नंबर आहे एकदोनतीनचार...".
प्रत्येक जण लोकपाल आपापल्या सोयीनुसार बसवू शकतील. बहुदा कॉंग्रेस-वाले दीड दिवसाचा ठेवतील, तर भाजप-वाले पूर्ण बारा दिवसांचा. लोकपालांच्या आरती नंतर खिरापत आपापसात वाटून घेण्याची गणपतीची प्रथा इथेही चालू ठेवावी लागेल. राज्याराज्यात छोटे लोकपाल म्हणजे लोकायुक्त बसवावेत. हे छोटे लोकपाल पालीकेच्या हौदात विसर्जित होतील, तर मोठे जन-लोकपाल भव्य अशा सागरात ( जन-सागरात ) विसर्जित होतील. लोकपालाबरोबर गौरी बसवायच्या असतील तर किरण बेदी-मेधा पाटकर, मायावती-ममता, वा अरुणा रॉय-सोनीया अशा ज्येष्ठा-कनिष्ठा जोड्या बसवता येतील. रोज लोकपालाची खाली दिलेली आरती करण्यात येईल व टेबलाखालून सर्वांना खिरापत वाटण्यात येईल.
कुठल्याही सामूहिक दैवताच्या आख्यायिका असाव्या लागतात तरच ती दैवते चांगली फोफावतात असे आढळून आल्याने, सामूहिक लोकपालाच्या खालील आख्यायिका अधिकृत समजल्या जातील :
१) एकदा सर्व लोकपाल शर्यत लावतात. प्रत्येक लोकपालाकडे एक सरकारचा घडा दिलेला असतो. त्यात त्याने एक भ्रष्टाचाराचा अपराध झाला की एक खडा टाकायचा. ज्याचा घडा लवकर भरेल व जो जगाला तीन प्रदक्षिणाही घालील तो लोकपाल विजयी घोषित करण्यात येईल. अण्णांचा जनलोकपाल खूप हुशार असतो. तो गुपचूप महाराष्ट्रात येतो, रस्त्यावरची उखडलेली खडी घडयात टाकतो व राळेगणसिद्धीला तीन प्रदक्षिणा घालतो. त्यालाच विजयी घोषित करतात. कारण राळेगणसिद्धी हेच त्याचे जग असते !
२) एकदा न्हाणीघरात सोनियाजी न्हात असतात. ( हिंदी व्हर्शन: एक बार सोनियाजी भारतकी गंगा न्हा रहे थे ! ). बाहेर रखवालीला त्या आपल्या विश्वासातल्या मनमोहनाला बसवतात. ( राहूल अजून तयार झालेला नसतो ). तेव्हढ्यात तिकडून एक "जनता" येतो. ( अरे, ये जनताही खरी मालिक है, ये तो उसके सेवक है !--- इति रामलीलावरचे अण्णा .). तो म्हणतो मला बाईंना भेटायचेय. मनमोहन मना करतो. "जनता"ला राग येतो. तो मनमोहनाशी लढतो. त्यात मनमोहनाचे डोके उडते. तेव्हढ्यात बाई बाहेर येतात व "जनता"ला म्हणतात, अरे हा तर आपलाच मनमोहन होता ना ! आता तर हा डोक्यानेच गेला. ह्याची पगडी आता कशी बांधायची ? सिर सलामत रहता तो पगडी पचास ना ! मग "जनता" म्हणते काही काळजी नको, आपल्या कडे भरपूर पांढरे हत्ती पाळलेले आहेत. त्यांच्याच एकाचे सिर लावू यात. तर तसे केल्यावर मनमोहनाचा लोकपाल तयार होतो व तोच सध्या आपल्यावर देखरेख करीत आहे बरे !
गणपतीला जसे मोदक प्रिय असतात, तसे लोकपालाला मिडीया-बाईटस्‌ प्रिय असून त्यांचे किमान २१ चॅनेल्स वरचे बाईटस्‌ लोकांना वाटावे लागतील. सामूहिक गणपतीच्या जशा आरोळ्या असतात तशा लोकपालांच्याही गर्जना असतील :
एक दोन तीन चार , सगळीकडे भ्रष्टाचार !;
किंवा एक दोन तीन चार, लोकपालांचे भय भय फार ! ;,
किंवा लोकपाल गेले कमीटीला ( स्टॅंडिंग कमीटीला ), चैन पडेना आम्हाला ! ;,
लोकपाल म्होरं या, पुढच्या वर्षी लौकर या ! ;,
किंवा लोकपाल गप्पा--थोर या ! ;,
किंवा लोकपाल गप्पा--बोर या ! ;,
लोकपाल गप्पा--घोर या ! ;.
सामूहिक लोकपाल उत्सवात ( अण्णा जसे "भारत माता की जय" असे आवाहन करतात तसेच, पण इस्लामप्रमाणे देशाला वा आईला देवाचा दर्जा नामंजूर असल्याने ) निधर्मी घोषणा असेल :
"भारत खाता ही-- हय !" किंवा "भारत जिताही--- नय !" किंवा "भारत खाता भी-- लय !" किंवा "भारत की नीती भी-- गय !"

-----------------------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
---------------------------------------------------------------------------------------
लोकपालाची आरती:
नोकरशहांना, खासदारांनो, वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी ऐट लोकपालाची
सर्वांगी सुदूर अटी भ्रष्टाचाराची
कंठी आवळे फास कारवाईची
जयदेव जयदेव जय लोकपाला, दर्शन मात्रे जन धन्य हो झाला

जय देव जय देव जय लोकपाला
तुमच्याच्याने देश स्वच्छ हो झाला
जय देव जय देव ... ||
तुमच्या फटक्याने घाबरले सारे
सांगती एकमेका सावध व्हा सारे
काळ्या पैशाने हो पोबारा केला
जय देव जय देव... ||
लोकपाल वंदूया लोकपाल भजूया
विसर्जनाची वाट पाहूया
संपले दहा दिवस खाऊया चला
जय देव जय देव ... ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा