marathi blog vishva

शुक्रवार, ८ एप्रिल, २०११

नारदाची कळ---१३
अण्णांचे फिक्सिंग
२-जी, कॉमनवेल्थ, आदर्श, नोट-फॉर-व्होट, देवास, सीव्हीसी व अशा अनेक घोटाळ्यांमुळे कॉंग्रेसची छबी मळली, हे तर त्यांनाही कळलेच. तशात तीन-चार राज्यात निवडणुका लढवायच्या आहेत. तिथेही ह्या भ्रष्टाचारामुळे मार खावा लागेल. आता भ्रष्टाचाराची ही छबी धुवायची तर आपण भ्रष्टाचार विरोधी आहोत, हे लोकांना सहजी पटेल असे व्हायला पाहिजे. भ्रष्टाचार न करता राज्य करणे, हे तसे जिकिरीचे व लांब पल्ल्याचे काम. त्याच्याने छबी धुवायला खूपच उशीर लागेल. गेले तीन चार महिने आपले संवाददाते तुमच्यापेक्षा आम्ही बरे आहोत, निदान कारवाई करतो आहोत, असे घसा फोडून फोडून तसा प्रयत्न करताहेत . पण ते कसे तुलना केल्यासारखे होते. आधी त्यांचे नाव घ्यावे लागते. आम्हीच बेश्ट आहोत असे ठसवायला हवे. तर मग स्वच्छ वागून दाखवायला हवे. पण, तितका वेळ आहे कुणाकडे ? मग मालिकेत कसे, नायिकेचे चारित्र्य उठविण्यासाठी खलनायकाला अडचणीत आणतात, त्याला हाणतात, तसे, शत्रूचा शत्रू तो मित्र, ह्या वळणाचे काही तरी पटकन करायला हवे. हे कसे करायचे ? ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्यावर कठोर कारवाई करायची वगैरे बाळबोध मार्गाने एकतर वेळ चिक्कार लागेल व शिवाय त्यात आपला काय फायदा ? आणि तरीही छबी अशी झाली पाहिजे की बघा, आम्ही किती भ्रष्ट्राचार्‍यांच्या विरुद्ध आहोत हे पटकन जनतेच्या ध्यानात यायला हवे.
तर साहेब, तुम्ही ते हिंदू आतंकवाद्यांचे चित्र उभे केले होतेत, तसे काही कराना. तुमच्याकडे एवढ्या आयडिया असतात. मग जमले तर तुमच्या लव्हासाचे बघू ना काही निस्तरता येते का ते. तर काही तरी छबी सुधरवण्याचे बघाच . भ्रष्टाचाराच्या विरोधी आहोत असे चित्र तयार होईल असे काही तरी बघा ना.
हां. भ्रष्टाचार का ? भ्रष्टाचार-विरोधी छबी काय ? बरं, अरे ते आपले अण्णा काय करताहेत आजकाल ? काही नाही ? लोकपाल बिलाचा आराखडा वगैरे करताहेत. व्वा ! व्वा ! बेस ! काम झाले की. त्यांना बोलवा इथे. बसवा जंतर मंतर ला. फार तर काय, तर बिलाचे करावे लागेल एवढेच ना ? अशी तर, ढीगभर बिले पडून आहेत आपल्याकडे. त्यातून नंतर काही तरी मार्ग काढता येईल. शिवाय नंतर कमीटीतही काहीतरी करता येईलच. पण आत्ता तर परस्पर रान पेटवून आपली पोळी शेकता येईल. फक्त माझे नाव मध्ये आले नाही पाहिजे. ते अवघड नाही हो, तुम्ही चिडून कमीटीतून बाहेर पडा, म्हणजे कोणाला संशयही येणार नाही. पण थोडे ताणून धरले पाहिजे. जॉइंट कमीटीसाठी . असे कसे करता येईल म्हणायचे . मग पार्लमेंटच बरखास्त करा म्हणायचे . मग कमीटीत पाच जण घेतो म्हणायचे, मग नोटिफिकेशन नाही काढत म्हणायचे . आत्ता मॅडम दक्षिणेत निवडणूक-प्रचारात आहेत म्हणायचे . आणि मग मी सांगीन तेव्हा हो म्हणायचे. मग अण्णांची तारीफ करायची. त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईचे खूप स्तोम माजवायचे . पाहिजे तर भारत-रत्नही द्यायचे. मग आपसुकच आपण त्यांचे मानले, म्हणजे आपण त्यांच्या बरोबरच होतो, हे वेगळे सांगायला नकोच. निवडणुकात बघा ह्यावरच मतं मिळतात की नाही.
पण, हे बघा, हे सगळे आमच्या आय-पी-एल च्या आधी संपले पाहिजे हां. नाही तर आमचा धंदा मंदा व्हायचा !
ओ के ? फिक्स ?

----------------------------------------------------------------------------------

1 टिप्पणी:

  1. आजच ह्या विषयावर माझ्या एका मित्राशी बोलणे चालू होते...मला पण असाच फिक्सिंग चा संशय होता. कालच मी ब्लॉग वर लिहिले कि शरद पवारन सारख्या मातब्बर राजकारणी माणसाची विकेट काढली तेव्हाच समजले काही तरी डाळ शिजतेय.
    सुंदर लिहिला आहे

    उत्तर द्याहटवा