नारदाची कळ---१६
स्वर्ग का नरक ?
आजकाल एक नवीनच चर्चा सुरू झाली आहे. स्वर्ग व नरक हे खरेच आहेत की नाहीत ? ह्यावर प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हे शास्त्रीय निर्वाळा देतात की असे काही नसते. ह्याच विषयावर श्री.गिरिश कुबेर ह्यांनी लोकसत्तेत आजच एक लेख लिहिलेला आहे. त्यांचा "अन्यथा"सदरातला स्टीफन हॉकिंगवरचा लेख छानच आहे. पण मुळात कोणताच विचार काळे-गोरे ह्या काटेकोर रंग-परीघात बसणारा असत नाही . म्हणूनच तर गल्लतीची शक्यता कायम राहते .
ज्या स्टीफन हॉकिंगचे आपण गोडवे गातो त्याच्या, फार लोकांना माहीत नसलेल्या काही बाबी, त्याच्या बुद्धिमत्तेच्या प्रगल्भतेनंतर, जरा काळजीने पहा. ह्याची बायको इंग्रजीची प्राध्यापिका. तीन मुले व स्टीफन ह्यांचे आदर्श संगोपन करीत असताना, ह्या स्टीफन महाशयांनी ज्या विद्यार्थ्याने ह्यांच्या खुर्चीवर बोलण्याचा संगणक बसवून दिला होता, त्याच्याच बायकोबरोबर ( ही नर्स होती ) संधान जुळवले. एव्हढा गलितगात्र असतानाही, पहिलीशी घटस्फोट घेऊन तिच्याशी लग्नही केले. तरीही त्यांचे चाळे शमले नाही. एकदा हा घरात मार लागून पडलेला आढळला, एका विद्यार्थ्याने पोलिसात नेले तर बायकोने ठिकठिकाणी ओरखडे काढलेले. ज्या विकलांग शरीरात इतकी प्रगल्भ बुद्धी वसते आहे, त्याच, एकही स्नायू काम न करणार्या शरीराने, त्याला इतके पछाडावे ? ह्या एकाच प्रमादापायी कोणाही चित्रगुप्ताने स्वर्गाची दारे ह्याला बंद करावीत असेच हे वागणे आहे. शास्त्रज्ञाच्या शिक्कामोर्तबाने आता ह्याने म्हणावे की स्वर्ग किंवा नरक असे काही नसते, तर ते शास्त्रीय किती व मानस-शास्त्रीय किती हे कळणे अवघड आहे.
आपला असा समज दिसतो की माणसाच्या ज्या नैसर्गिक उर्मी असतात त्या रास्तच असतात. पण जरा विचार केलात तर दिसेल की ह्या उर्मींना माणसाला कायम एका शिस्तीच्या स्वाध्यायाने पारखून घ्यावे लागलेले आहे. नर-मांस-भक्षणाचे उदाहरण घ्या. प्रथम आदिमानव नरमांसभक्षण करीत असे. त्या उर्मीला कठोर नीती-नियम लावून जेव्हा त्याने हजारो वर्षे स्वत:लाच पटवले, तेव्हाच ही उर्मी आताशी लोप पावत आली आहे. ही कठोर स्वाध्यायाची शिस्त बाळगणे ही स्वर्गाची एक प्रकारची हमीच म्हणायला हवी. मातागमन, बहिणीशी संग ह्या उर्मी ( जर कुणाला आल्याच तर ) शिस्तीने निकामी करण्यासाठीच कुठलाही समाज, आई-बहिणीवरच्या शिव्या निर्माण करत असतो. व तरीही तुम्ही त्या उर्मींबरोबर वाहवलात तर ते नर्कात पडल्यासारखेच आहे असे आपण समजतो. स्वर्ग वा नरक ह्या कल्पना ह्या शिस्तीसाठी आवश्यकच असतात, कुठल्याही धर्मात . तुमच्याच कार्यक्षेत्रातले उदाहरण घ्यायचे तर आजही अशी वर्तमानपत्रे आहेत ज्यात अग्रलेख चार ठिकाणी चार तुकड्यात दिलेला असतो. तुमच्यासारख्यांची शिस्तच मग व्यवस्थित अग्रलेखाला त्या वर्तमानपत्राला नरकातून काढते . स्वर्ग करते.
साहित्यात कविता हा प्रकार सहज स्फूर्तीचा आपण मानतो, व म्हणूनच न जाणो ह्या सहज-स्फूर्तीमुळे ह्या साहित्यप्रकारात काही गहिरे सत्य, मूल्य, असावे असे समजून त्याला चांगलाच मान देतो. पण कुठल्याही कवीला, भाषेच्या शिस्तीतून ( शब्द, अर्थ, वृत्त वगैरे ) ह्या स्फूर्तीला न्यावेच लागते. असे नेताना जर त्याने कधी "झपूर्झा" असा कधी न ऐकलेला शब्द वापरला असेल तर मग टीप द्यावी लागते की हा शब्द म्हणताना पोरी झिम्मा खेळताना जो आवाज होतो ( झिम पोरी झिम सारखा ) तसाच आवाज होतो. मानवी स्फूर्तींना शिस्तीचा, विवेकाचा, तारतम्याचा चाप प्रत्येक प्रबुद्ध समाजाला लावावाच लागतो व तेव्हाच तो स्वर्ग होतो. मग भले असा स्वर्ग स्टीफन हॉकिंग म्हणतात तसा अस्तित्वात असो वा नसो.
आपल्याकडे काश्मीरच्या सौंदर्याची वाखाणणी करताना म्हणतात की पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो इथे आहे, इथे आहे, इथे आहे. ( अमीनोस्तु अमीनोस्तु अमीनोस्तु ). ह्याच काश्मीरात परवा दल लेकवरचा एक काश्मीरी सांगत होता की, खरे तर आमच्या श्रीनगर चे आधीचे नाव श्री-नरक असले पाहिजे ! माणसांचा जसा कायम नरकाचा स्वर्ग करण्याचा चंग असतो तसा कधी कधी ( किंवा आजकाल बहुतेक ठिकाणी ) स्वर्गाचा नरकही होत असतो. मग स्नायू हतबल स्टीफनजी, स्वर्ग-नरक, नाहीतच असे कसे म्हणावे ?
----------------------------------------------------------------------------