नारदाची कळ---१२
अकलेच्या कांद्याची गोष्ट
एक होता कांदा. अहो तो महाग-वाला नाही, अकलेचा. अकलेला मती म्हणतात, तर हा बारा अकलेचा ! ( कदाचित बारामतीचा !) तो अगदी पहिल्यांदा बेता बेताने, बांधा बांधाने ( कुंपणा कुंपणा ने ) लागवडलेला होता. त्याच्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. तोच कुंपणाच्या देवाने, कराडच्या देवाने, त्याला आपल्यात घेतले, आपला मानसपुत्रच मानले व स्वत:सारखे "यशवंत" केले. ह्यानेही सहकार दिला, घेतला. होता होता, हा सगळीकडेच वावरू लागला. राज्यात मुख्य झाला, केंद्रात सुरक्षेच्या बाडबस्तात सुरक्षित झाला. कांद्याला असे घुमारे फुटू लागल्यावर त्याला आपल्या मुळाचा लईच अभिमान वाटू लागला. कोणाचे मूळ परदेशी असेल तर ते त्याला रुचेना. त्यासाठी त्याने आपापल्या मुळांचा देशी वाफाच काढला, ताफा वाढवला व विदेशी मुळांना तो कमी लेखू लागला.
पण भारतदेवाच्या मनात काही वेगळेच होते. परदेशी मुळाचे कांदे जोम धरू लागले, त्यांना कुठली तरी सूप्त परदेशी गंगाजळी मिळू लागली व त्या परदेशी कांद्याने चांगलेच बाळसे धरले . सगळे वावर व्यापून टाकले. आता बांध्यावरच्या कांद्याला मुख्यप्रवाहात डुंबावे असे हुळहुळू लागले. मग त्याने मुळेच ना ती, ती देशी काय व परदेशी काय असे म्हणत परदेशी मुळांच्या कांद्याशी दिलजमाई केली. परदेशी कांद्याला खांदा दिला, सापडेल तिथे चांद्या शोधल्या, जमवल्या, आणि देशात सगळीकडे आपल्या फांद्या पसरविल्या.
परदेशी कांद्याची रीतच न्यारी. त्याला वाटू लागले मी किती निर्मळ, स्वच्छ संगमरवरी ( इटालियन संगमरवरच जणु ) रूप, काय ती उभारी, काय तो तोरा ! तेव्हढ्यात त्या परदेशी कांद्याला आतले आवाज ऐकू येऊ लागले. त्यालाही वाटू लागले आपण जरा आतल्या आतच रहावे. कावळा शिवल्यासारखे बाजूलाच रहावे . आपण पुढे होऊ नये. मग त्याने त्यातल्या त्यात धुतलेल्या तांदळासारखा वाटणार्या पंजाबी कांद्याला पगडी पहनवली. पगडी, आनंदाने परदेशी कुंकू मिरवू लागली. बारा-अकलेच्या कांद्याने वाफ्यात नफा काढायची जबाबदारी घेतली. सगळीकडचे वाफे तरारून येतील, असे तो सांगू लागला. आपले मूळ गाव, बारा-अकली गाव, असलेल्या राज्यात देशी-विदेशी कांद्याची जोड-लागवडही त्याने चालू ठेवली.
बारा-अकली कांदा जोशात आला, उडू बागडू लागला, खेळ खेळू लागला. असा तसा देशी खेळ नाही तर परदेशी कांद्याला टुकटुक करणारा, त्याची विकेट काढणारा, परदेशी खेळ, क्रिकेट ! हा खेळ इतका चढू लागला की त्या बोभाट्या पाई त्याला लोक पीयेल समजू लागले. तो म्हणे काय बोलता, मी ? आय पीयेल ?
वाफ्यावरचे काम असे चालू असताना एक अवघड घडी आली. वाफ्याचा खर्च ताफ्याला परवडेना . ताफ्यातले एकेक गडी आत्महत्येने पडू लागले. सगळीकडे गदारोळ माजला. बारा-अकली कांद्याने थाप ठोकली, ही कांद्याची शेतीच परवडणारी नाही . सबब कोणी कांदे पेरुच नयेत. पगडी गदगदली. तिला वाटले जीव वाचला तर पगडी काय, पचास पेहनू . मग त्याने ताफ्याला सर्व-माफी दिली, कर्ज-माफी दिली. बारा-अकली कांद्याला हुरूप आला. त्याने आता थंड हवेच्या ठिकाणी लागवड होऊ शकते का, हे पाहण्यासाठी डोंगर कापले, दर्या बुझवल्या व उंचावर एक ठिकाण केले, इतके छान की बारा-अकली कांदा अगदी "हवासा" झाला, लव्हासा झाला !
तेव्हढ्यात कोणाची तरी नजर लागली. आतल्या गाठीच्या ह्या बारा-अकली कांद्याच्या तोंडाशी एक गाठशी आली. फवारून झाले, टोकरून, खुडून झाले. तशी तरारी आहे, खतपाणी अंगी लागते आहे. पण त्या तोंडाच्या गाठी मुळे तोंडातून शब्दांऐवजी आजकाल मुक्ताफळेच येतात. लवकरच आलबेल होईल असे म्हणायचे असते, पण तोंड बोलून जाते...कमसे कम तीन हप्ते लगेंगे ! परदेशी कांद्याचा छोटा कोंभ, हूल देत, मग रागावून म्हणतो, मेरे दादी का राज अकेली का था, ये हमारी मजबूरी है, ( मजबूरी का नाम गांधी !). त्यावर तोंड लगेच तावातावात उदगारते, इटली मे भी मजबूरीच है ! पगडी घाबरून पाकी कांद्याला पाचारण करते तर तोंड लगेच खोड काढते, ह्यापेक्षा आपल्याच बळीराजांना का नाही देत जरा ज्यास्तीचा भाव ?
पानीपतावर मराठयांची पत गेल्याला भले आज अडीचशे वर्षे झाली असतील, पण त्याचा वचपा काढतोय, बघा, बारा-अकली कांदा व त्याचे तोंड !