नारदाची कळ---९
जेपीसीचे पिसे
रोज लोकसभेत तोच जेपीसीचा गदारोळ पाहून वाटायला लागते की कॉंग्रेस सर्व दोषींना शिक्षा द्यायला तयार आहे, सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीत सीबीआयची मदत द्यायला तयार आहे, पण जेपीसी मार्फत नाही तर पीएसी मार्फत. आणि त्या पीएसीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी असताना विरोधी पक्षांना जेपीसीच हवी आहे, ती का ?
जेपीसी त सभासद घेताना परत कॉंग्रेसचेच सभासद ज्यास्त असणार आहेत, त्यामुळे निष्कर्ष विरोधात जाईल ही भीती नाहीय. पण सारखे सर्व प्रकरण लोकांसमोर ठळकपणे येत राहणार व त्याने बदनामी होणारच. आता पहिल्याच जेपीसीचे बघा. ही नेमली होती, बोफोर्स घोटाळ्यासंबंधी. काय झाले ? शिक्षा कोणाला झाली ? शस्त्रास्त्रे खरेदीच्या नियमांमध्ये काही सुधारणा झाल्या का ? अजूनही नवनवे संरक्षण खात्यातले घोटाळे होतच आहेत. मग मिळाले काय ? तर राजीव गांधींच्या चारित्र्यावरचा डाग धुतल्या गेलाच नाही. त्याची जबर किंमत चुकवावीच लागली. ह्यालाच सोनियाजी घाबरत असाव्यात.
गंमत म्हणजे अगदी ह्याअगोदरची जेपीसी कमीटी शरद पवारांच्या अध्यक्षतेखालची होती. शीतपेयात घातकी कीटकनाशके आढळली त्याविरोधात. त्याचे काय झाले, ते कोणाला माहीत आहे ? कोणते पाणी शीतपेयवाल्यांनी वापरावे ते सुद्धा नक्की झाले नाही, बंदी तर कोणावरच झाली नाही. हवे ते शीतपेय, तसेच, अजूनही राजरोस मिळते आहे. म्हणजे ह्यापुढे कोणी ए.राजा सारखा भ्रष्टाचार करणार नाही अशी काही व्यवस्था करण्यासाठी जेपीसी हवी असे म्हटले तर खरे आपल्याला सहजी समजू शकेल. मागच्या इतिहासावरून ! ( नाही म्हणायला हर्षद मेहता प्रकरणावरच्या जेपीसी ने शेयर बाजारावर थोडी नियंत्रणे आली हीच एक जमेची बाजू जेपीसीची ! ). जेपीसी द्वारे कोणाला शिक्षा व्हावी, व्यवस्थेत सुधारणा व्हावी ही अपेक्षा अगदी बाळबोधपणाची ठरते. पण सत्ताधार्यांना धक्का द्यायला हे हमखास उपयोगी शस्त्र आहे ह्याबाबत दुमत असू नये.
परदेशातले काळे धन परत आणण्यासाठी आपण किती व कसे प्रयत्न केलेत ते सांगतांना प्रणब मुखर्जी नुकत्याच झालेल्या लीडरशिप समिट मध्ये म्हणाले होते की एका देशाने आम्हाला एका माणसाची माहीती दिली व त्याप्रमाणे आम्ही त्याच्याकरून वाढीव कर वसूलही केला आहे, पण त्या देशाचे वा माणसाचे आम्ही नाव सांगू शकत नाही. खूप प्रयत्नांचे हे हाल असतात तर जेपीसी वगैरेतून गेलेले पैसे परत मिळणे विसराच !
विरोधी पक्ष व सरकार ठामपणे जेपीसी का हवी वा का नको हे सांगत नाहीत त्यामागे ही कारणे आहेत हे सूज्ञांना मात्र लगेच ध्यानात यावे !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com