marathi blog vishva

शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०१०

नारदाची कळ---८
आमुचे आम्ही वाया गेलो
परवा जालना येथे नेमाडेंना "कोठारे" पुरस्कार देण्यात येणार होता. पुरस्कार रु.२५ हजारांचाच होता. पण त्यानिमित्त लाख मोलाची गरळ ओकता आली असती, ती तशीच राहिली. हे कोठारे कोण आहेत ? खरे तर आता मराठी साहित्यसंमेलनास माणिकचंद गुटखा वाल्यांनी भरघोस मदत द्यावी, आपल्या गृहमंत्र्यांनी "ऐसे छोटे मोठे हादसे होते रहते है" असे म्हणत गुंडांसोबत पार्ट्या कराव्यात, असा उफराटे वागण्याच्या काळात हे कोठारे कोण हे गैरलागू होते. समजा ते गुटखा बनवणारे उद्योजक असतील तर आपण काही टाटांचे हॉस्पिटल चालवत नाही आहोत ( जिथे बोर्ड लिहिलेले असतात की तुम्हाला गुटखा खाऊन कर्क रोग झाला असेल तर त्यावर इथे उपचार करण्यात येणार नाहीत .). आपली तर साधी साहित्यिक दुकानदारी आहे. त्यात कसली आली आहे साधन-शुचिता !
"आपल्या साहित्यातला हिणकसपणा आपल्या लेखकांच्या उथळपणातून व अप्रामाणिकपणातून येतो, हे जर खरे असेल तर आपल्या लेखकांना वेळीच त्यांचे दोष का दाखवले जात नाहीत ?" असे नेमाडे आपल्याला एकेकाळी विचारून गेले आहेत. आता तेच विचारताहेत तर एक वाचक म्हणून त्यांना सांगणे आपले उत्तरदायीत्व ठरते. कारण हा पुरस्कार ही तर नुकतीच सुरुवात आहे. असे किती तरी पुरस्कार त्यांना "हिंदू" वर घ्यायचे बाकी आहे. "सरकारी बक्षीसाच्या चढाओढीत प्रकाशकांचा किती सहभाग असतो हे प्रत्यक्ष क्षेत्रातल्यांना नीट माहीत आहे, काही लेखक तर प्रकाशकांच्या रखेल्याच आहेत" हा सल्ला त्यांना एक तरुण लेखक( नेमाडे, टीकास्वयंवर, पृ.३७) देतो आहे, हे त्यांनाच आता पटणार नाही. पण बोलना बनता है भिडू !
"पारितोषिकांचा साहित्यिकाच्या कसाशी फारसा संबंध नसतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरही नोबेल सारखी बक्षिसं असाहित्यिक कारणांवरूनच दिली जातात....अशा बक्षीस न मिळालेल्या थोर लेखकांच्या यादीत बसण्याचा प्रयत्न करावा , असं मी चांगल्या लेखकांना सांगेन"(टीकास्वयंवर पृ,३८४). असं जर दस्तुरखुद्दांचं म्हणण असेल तर मग नेमाडेंनी गुटखा पुरस्कार स्वीकारावा का ? आता अमेरिकेचे निम्मे भाडे तरी निघेल, हे खरे. शिवाय ज्या "लेखन-बाह्य" राळेमुळे १५ हजार प्रती खपल्या, त्याला अजून थोडी गरळ ओकून हातभार लावता आला असता.
वाचकांच्या दृष्टीने शेवटी (वाचाल तर वाचाल !),सर्व वायाच जाते, तर लेखकाने तरी "आमुचे आम्ही वाया गेलो" का होऊ नये ?
लई भंकस झाली राव, गुटखा तरी काढा, हिंदुराव !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com